Chhatrapati Sambhaji Nagar : संभाजीनगरच्या कॅनॉट प्लेस परिसरात टोळक्याची फ्री स्टाईल हाणामारी; चहा पिण्यावरुन झाला वाद
Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा दोन टोळक्यात राडा पाहायला मिळाला आहे. या प्रकाराने शहरातील सर्वात गजबजलेला कॅनॉट परिसर पुन्हा एकदा चर्चेचा विषय झाला आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) पुन्हा एकदा दोन टोळक्यात राडा पाहायला मिळाला आहे. चहा पीत असलेल्या तरुणांच्या दोन गटात रस्त्यावरच हाणामारी झाल्याचा प्रकार कॅनॉट प्लेस परिसरात घडला. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात चार जणांसह अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराने शहरातील सर्वात गजबजलेला कॅनॉट परिसर पुन्हा एकदा चर्चेचा विषय झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कॅनॉट प्लेसमध्ये होणारी गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे रात्री उशिरापर्यंत तरुणांची तुफान गर्दी या परिसरात पाहायला मिळत असते. तर तरुणांचे शेकडो टोळके या परिसरात तंबू ठोकून असतात. त्यामुळे छोट्या-मोठ्या वादाच्या घटना सतत या परिसरात घडताना पाहायला मिळतात. दरम्यान काल 25 जून रोजी रविवारी पुन्हा एकदा या ठिकाणी टोळक्याची फ्री स्टाईल हाणामारी पाहायला मिळाली.
नेमकं काय घडलं?
रविवार असल्याने काल कॅनॉट प्लेस परिसर तरुणाईने तुडुंब भरला होता. रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास तरुणांचे एक टोळके चहाच्या दुकानावर चहा पीत होते. त्याचवेळी दुसरा पाच सहा जणांचा गट तिथे दाखल झाला. किरकोळ कारणावरुन त्यांच्यात कुरबुर सुरु झाली आणि पाहता पाहता हे दोन्ही गट एकमेकांना भिडले. प्रचंड आरडाओरड आणि शिवीगाळ सुरु झाली. दोन्ही गट एकमेकांवर अक्षरशः तुटून पडले. या राड्यात अनेक तरुणांचे शर्टही फाटले. तर या लोटालाटीत काही जण खाली रोडवरच पडले. हा गोंधळ पाहून अनेकांनी तिथून काढता पाय घेतला. तर काहींनी पोलिसांना फोन केले. तर याची माहिती मिळताच सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी तातडीने पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक कॅनॉट प्लेसमध्ये पाठवले. या प्रकरणी काही तरुणांना ताब्यात घेण्यात आले असून, चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर इतरांचा शोध सुरु आहे असे पोलीस निरीक्षक पवार यांनी सांगितले.
कॅनॉट प्लेसमध्ये नेहमीच वादाच्या घटना
शहरातील कॅनॉट प्लेसमध्ये संध्याकाळी आणि रात्रीच्या सुमारास मोठी गर्दी असते. ज्यात तरुणाचे टोळक्याचे टोळके या ठिकाणी दिसून येतात. रस्त्यावर वेगाने गाडी पळवणे, स्टंटबाजी नेहमीच पाहायला मिळते. त्यामुळे छोट्या-मोठ्या कारणावरुन या ठिकाणी सतत वादाच्या घटना घडतात. दोन गटात वाद झाल्याच्या अनेक घटना या परिसरात घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांची पेट्रोलिंग वाढवून, टवाळखोरांवर वचक ठेवण्याची मागणी केली जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: