मंत्री भुमरेंच्या विरोधात तक्रार देणाऱ्या तरुणाच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप; पोलिसात गुन्हा दाखल
Chhatrapati Sambhaji Nagar : या प्रकरणी शहरातील पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar News : राज्याचे रोहयो मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसात तक्रार देणाऱ्या तरुणाच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप संबंधित तरुणाने केला आहे. भाऊसाहेब वाघ असे या तरुणाचे नाव आहे. गेल्या आठवड्यात भुमरे यांनी या तरुणाला फोनवरुन शिवीगाळ केल्याची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर वाघ यांनी भुमरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पोलिसात तक्रार दिली होती. दरम्यान आता आपल्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप वाघ याने केला असून, या प्रकरणी शहरातील पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसात दिलेल्या तक्रारीत वाघ यांनी म्हटले आहे की, "25 जूनला रात्री काळ्या गाडीतून काही लोक माझ्या घरासमोर येऊन त्यांनी दार वाजवले. या लोकांना पाहून मी तात्काळ 112 नंबरला फोन लावला. त्यामुळे हल्ला करण्यासाठी आलेले लोक पळून गेले." दरम्यान वाघ यांच्या तक्रारीनंतर छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी पुंडलिकनगर पोलिसात या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे प्रकरण?
संदीपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघातील दरकवाडी गावात बाबासाहेब वाघ नावाचा तरुण राहतो. काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहरात राहण्यासाठी आला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्याच्या गावात रस्त्याचे काम सुरु झाले. पण रस्ता न करताच पैसे उचलण्यात आल्याचा आरोप वाघ याने केला आहे. तर हे काम मंत्री संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे यांचे असल्याचे गावातील लोकांनी सांगितल्याने आपण भुमरे यांच्या मालपाणी नावाच्या पीए यांना फोन करुन कामाबद्दल विचारणा केली होती, असं वाघ यांचे म्हणणे आहे. दरम्यान, याचाच राग आल्याने भुमरे यांनी आपल्याला फोनवरुन शिवीगाळ केली, तसेच तुझ्या घरी येतो, असे म्हणाले. त्यामुळे आपण प्रचंड दहशतीत असल्याचा आरोप या तरुणाने केला होता. तर भुमरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत त्याने पोलिसात तक्रार देखील दिली होती.
दानवे यांची प्रतिकिया...
दरम्यान या सर्व प्रकरणावर बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, कार्यकर्ते फोन करत असतात, रागवत असतात. त्यामुळे काम करत असताना आपण थोडं संयम बाळगला पाहिजे. कोणीतरी आरोप केले म्हणून लगेच आपण उत्तर द्यावे, शिवीगाळ करावे हे चुकीचे असल्याचे दानवे म्हणाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
Sandipan Bhumre: संदीपान भुमरेंनी शिवीगाळ केलेल्या तरुणाचा उद्धव ठाकरेंशी संवाद; ऑडिओ क्लिप व्हायरल