Mhada Lottery Konkan Board : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
Mhada Konkan Board : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांची सोडत येत्या 31 जानेवारीला होणार होती. ती लांबणीवर गेल्याची माहिती आहे.
मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या म्हणजेच म्हाडाच्या (Mhada) कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (Konkan Board Lottery 2025) 2264 सदनिकांच्या विक्रीसाठीची सोडत लांबणीवर गेली आहे. ही सोडत आता फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. म्हाडाकडून यापूर्वी 31 जानेवारी ही तारीख सोडतीसाठी निश्चित करण्यात आली होती. सोडतीचा मुहूर्त लांबणीवर गेल्याची माहिती आहे. म्हाडाच्या कोकण मंडळानं या घरांच्या सोडतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ दिली होती.
म्हाडाच्या कोकण मंडळानं 2264 घरांच्या विक्रीसाठीच्या ऑनलाईन सोडतीसाठी अर्ज मागवले होते. या सोडतीत 20 टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत 594 सदनिका, 15 टक्के एकात्मिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 825 सदनिका, कोकण मंडळाच्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत विखुरलेल्या 728 सदनिका, रोहा-रायगड व ओरस सिंधुदुर्ग येथे 117 भूखंड विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले होते.
सोडत लांबणीवर
कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या सोडतीसाठी 31 जानेवारी 2025 तारीख म्हाडाच्यावतीनं यापूर्वी कळवण्यात आली होती. मात्र, ती लांबणीवर गेल्याची माहिती आहे. 31 जानेवारीला सोडतीचा कार्यक्रम होणार नसल्यानं आता तो कार्यक्रम फेब्रुवारीत होईल, अशी शक्यता आहे. कोकण मंडळाच्या या घरांच्या संगणकीय सोडतीचा निकाल अर्जदारांना निकाल तात्काळ मोबाईलवर एसएमएस द्वारे , ई-मेल द्वारे तसेच ऍपवर उपलब्ध करुन दिला जातो.
पात्र अर्जदारांची यादी प्रकाशित
कोकण मंडळानं 2264 घरांच्या सोडतीसाठी अर्ज दाखल करुन घेण्यास 11 ऑक्टोबर, 2024 पासून सुरुवात केली होती. कोकण मंडळानं दिलेली मुदत 6 जानेवारीला संपली होती. त्यानंतरपात्र अर्जदारांची यादी म्हाडाकडून प्रकाशित करण्यात आली आहे. म्हाडाच्या वेबसाईटला भेट देऊन अर्जदार त्यांच्या नावांची तपासणी करु शकतात. प्रकाशित यादीवर काही आक्षेप घ्यायचे असल्यास 22 जानेवारीपर्यंत घेता येतील. त्यानंतर पुन्हा एकदा अंतिम यादी 24 जानेवारी 2025 प्रकाशित केली जाईल. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीसाठी 20 हजारांच्या दरम्यान अर्ज आल्याची माहिती आहे.
म्हाडानं विविध उत्पन्न गट यासाठी निश्चित केले आहेत. त्यानुसार घरांची विक्री केली जाणार आहे. म्हाडाकडून अत्यल्प उत्पन्न गटातील अर्जदारांसाठी 6 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न निश्चित करण्यात आलं आहे. अल्प उत्पन्न गटातील अर्जदारांना 9 लाख, मध्यम उत्पन्न गटातील अर्जदारांना 12 लाखांची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तर उच्च उत्पन्न गटातील अर्जदारांसाठी कमाल उत्पन्न मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही.
इतर बातम्या :