(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'ही माझी शेवटची निवडणूक, माझ्यासमोर आव्हान नाही तर...'; मतदानाच्या दिवशीच नेमकं काय म्हणाले चंद्रकांत खैरे?
Lok Sabha Election 2024 : छत्रपती संभाजीनगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी ही निवडणूक आपली अखेरची निवडणूक आहे , अशी घोषणा केली आहे.
छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) आज महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात मतदान होत आहे. यात छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, रावेर, पुणे, बीड, नंदुरबार, अहमदनगर, शिरूर, जालना, जळगाव आणि मावळ या लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) विरुद्ध महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्यात प्रमुख लढत होत आहे. सकाळी चंद्रकांत खैरे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी ही माझी शेवटची निवडणूक आहे. त्यामुळे माझ्यासमोर आव्हान नाही तर विजयाचा विश्वास आहे, असे वक्तव्य केले आहे.
चंद्रकांत खैरे म्हणाले की, ही माझी शेवटची निवडणूक असणार आहे. त्यामुळे मला विजयाची पूर्णपणे खात्री आहे. शिवसेनेसोबत गद्दारी करून जे लोक गेले आहेत. ते माझ्या विरोधात उभे आहेत. मला आव्हान आता या वेळेस कोणाचेच नाही.
दारूचे दुकान सुरू करणारे उमेदवार माझ्या विरोधात
लोकांनी ही निवडणूक आपल्याकडे घेतली आहे. त्यामुळे माझा विजय निश्चित होणार आहे. वीस वर्षात मी हे शहर शांत ठेवलं होतं आणि पुढच्या टर्ममध्ये विकासाची दिशा माझ्याकडे आहे. दारूचे दुकान सुरू करणारे उमेदवार माझ्या विरोधात उभे आहेत, असा टोला त्यांनी यावेळी संदीपान भुमरे यांना लगावला आहे.
ही निवडणूक माझी अखेरची निवडणूक
ही माझी निवडणूक लढवायची सहावी वेळ आहे. त्यामुळे ही निवडणूक माझी अखेरची निवडणूक असणार आहे. त्यानंतर इतर जे तयार झालेले कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत. त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची संधी मिळायला हवी, असे वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केले आहे.
चंद्रकांत खैरे 100 टक्के निवडून येणार, खैरे कुटुंबियांना विश्वास
चंद्रकांत खैरे यांनी सहकुटुंब मतदानाचा अधिकार बजावला. चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारात संपूर्ण त्यांचं कुटुंब उतरलेले पाहायला मिळालं होते. चंद्रकांत खैरे यांच्यासोबत आम्ही चार टर्म, त्यांचं खासदारकीचे काम पाहिले आहे. मागची एक टर्म ते हरले त्यात आम्ही कुठेतरी कमी पडलो असं आम्हाला वाटते. यावेळी 100 टक्के आम्हाला गॅरंटी आहे, चंद्रकांत खैरे यावेळी निवडून येतील, असा विश्वास खैरेंच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला.
आणखी वाचा
आधी नोटा दाखवल्या मग बाटली दाखवत अंबादास दानवेंची प्रश्नांची सरबत्ती, संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर