(Source: ECI/ABP News/ABP Majha)
काय सांगता! सर्जा राजांना धुण्यासाठी विकत पाणी, बैलपोळा सणावर दुष्काळाचे सावट
Bail Pola 2023 : तर काही शेतकरी बैल धुण्यासाठी थेट वाशिंग सेंटर गाठत आहे.
औरंगाबाद : पावसाळा सुरु होऊन तब्बल तीन महिन्याचा काळ उलटला असून, अजूनही औरंगाबादसह (Aurangabad) मराठवाड्यात (Marathwada) अपेक्षित पाऊस (Rain) झालेला नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. आत्ता तर काही भागात परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की, बैलपोळा (Bail Pola) सणाच्या पार्श्वभूमीवर सर्जा राजांना धुण्यासाठी पाणी देखील विकत घ्यावी लागत आहे. तर काही शेतकरी बैल धुण्यासाठी थेट वाशिंग सेंटर गाठत आहे. औरंगाबादच्या पैठण तालुक्यात अनेक ठिकाणी अशीच काही परिस्थिती पाहायला मिळत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात अजूनही एकही अपेक्षित असा जोरदार पाऊस पडलेला नाही. त्यामूळे जिल्ह्यातील नदी, नाले कोरडेठाक पडले आहे. अशात आज शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण म्हणजे बैलपोळा साजरा केला जात आहे. या सणाच्या निमित्ताने शेतकरी आपला सर्जा- राज्यांना अंघोळ घालून नैवेद्य दाखवत असतो. तसेच, आपल्या बैलांना विविध साहित्याने नटवत असतो. मात्र, यंदा दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी हातबल झाला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली असताना बैलांना आंघोळ घालण्यासाठी पाणी कोठून आणणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत बैलांना धुण्यासाठी शेतकऱ्यांना चक्क पाणी विकत घ्यावे लागत आहे. औरंगाबादच्या विविध ठिकाणी असेच चित्र पाहायला मिळाले आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील आठवडी बाजारात पोळ्यासाठी विविध साहित्याची दुकाने थायली होती. पण, दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याने मोलाची साथ देणाऱ्या पशुधनाचा बैलांचा पोळा सण शेतकऱ्यांना उत्साहात साजरा करता येत नाही.
पोळा सणावर लम्पीचं सावट...
औरंगाबादसह मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात गोवर्गीय पधुधन लम्पी चर्मरोग या सांसर्गिक रोगाने बाधित झाल्याचे आढळून आले आहे. तसेच गोवर्गीय पशुधनामध्ये मर्तुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने बैल पोळा सणानिमित्त मोठ्या संख्येने गोवर्गीय पशुधन एकत्रित येत असल्याने निरोगी पशुधनास लम्पी चर्मरोग या सांसर्गिक रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, 2009 नुसार गोवर्गीय पशुधनाचे बैल पोळा सणानिमित्त एकत्रित येण्यास अनेक जिल्ह्यात सक्त मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व पशुपालक, शेतकरी यांनी बैल पोळा सण हा घरगुती स्वरुपात साजरा करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: