औरंगाबादची दंगल कशी घडली? पहिल्यांदाच अधिकृत माहिती समोर; फडणवीसांनी सभागृहात सांगितला सर्व घटनाक्रम
Aurangabad News : पोलिसांवर केलेले सर्व आरोप फेटाळून लावत, पोलिसांवर कोणतीच कारवाई होणार नसल्याचे देखील फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
Aurangabad News : राम नवमीच्या पूर्वसंध्येला औरंगाबाद (Aurangabad) शहरातील किराडपुरा भागात झालेल्या दंगलीबाबत पावसाळी अधिवेशनात आज चर्चा झाली असून, यावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करत याबाबत माहिती दिली आहे. तर ही दंगल कशी घडली, त्या दिवशी नेमकं काय झाले आणि पोलिसांनी ही सर्व परिस्थिती कशी हाताळली याबाबत देखील फडणवीस यांनी सभागृहात माहिती दिली आहे. विशेष म्हणजे पोलिसांवर केलेले सर्व आरोप फेटाळून लावत, पोलिसांवर कोणतीच कारवाई होणार नसल्याचे देखील फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, मला कल्पना आहे जिथे दंगल घडली त्याठिकाणी मोठ्याप्रमाणात अल्पसंख्याक समाजाची वस्ती आहे. त्याच ठिकाणी राम मंदिर आहे. वर्षोनुवर्षे त्या राम मंदिरात राम नवमी साजरी केली जाते. त्यामुळे राम नवमीच्या आदल्या दिवशी उशिरापर्यंत मंदिर सुरु असते आणि भाविक त्याठिकाणी येत असतात. दरम्यान त्यावेळी सुरवातीला तीन लोकं तिथे गेले आणि ते परत जात असतांना बाचाबाची झाली. त्यानंतर परिस्थिती शांत झाली. मात्र, परत सहा लोकं तिथे गेले. त्यावेळी त्यांना सांगण्यात आले की, मंदिर बंद आहे. त्यामुळे ते सहा लोकं देखील परत चालले होते. परंतु, त्याचवेळी मंदिरात 200 ते 250 लोकं लपून बसले असल्याची अफवा पसरवण्यात आली. तसेच लपवून बसलेले लोकं आपल्यावर हल्ला करणार असल्याची खोटी माहिती पसरवली गेली. या अफवांनंतर मोठा जमाव तिथे जमा झाला. प्रत्यक्षात मंदिरात कोणेही नव्हते आणि पोलीस देखील या जमावाला समजावून सांगत होते.
मात्र परत तिथे लोकं जमा झाले. त्याठिकाणी विटाचे ढीग होते. शेवटी पोलिसांनी या जमावाला थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्हीकडून पोलिसांवर दबाव येत होता. या घटनेत पोलीसजखमी झाले आहेत. यावेळी पोलिसांना मार खावा लगला आहे. त्यामुळे ज्यावेळी हे सर्वकाही हाताबाहेर गेल्याचे लक्षात आले आणि मोठी दुर्घटना होण्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी रबर बुलेट चालवल्या. माझ्याकडे याबाबत सीसीटीव्ही आहेत. तसेच या घटनेत जो व्यक्ती मृत्युमुखी पडला आहे, तो या जमावात होता. तसेच हा व्यक्ती दंगा घालण्यात सहभागी होता. जमावाला पांगवण्यासाठी जेव्हा रबर बुलेट चालवण्यात आल्या, त्यावेळी त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. तर पोलिसांनी कुठल्यातरी निष्पाप व्यक्तीला मारले हे खरं नाही. मुळात दंगल करणाऱ्यावर ही कारवाई झाली आहे. त्यामुळे पोलिसांवर कोणतेही कारवाई होऊ शकत नसल्याचे फडणवीस म्हणाले आहे.
मयत व्यक्ती दंगलीत सहभागी होता...
किराडपुरा भागात झालेल्या दंगलीत शेख मुनिरुद्दीन मोइनुद्दीन (वय 45 वर्षे) पोलिसांच्या गोळीबारात जखमी झाला होता. दरम्यान उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला होता. तर शेख याचा दंगलीशी कोणताही संबंध नव्हता. घराच्या गेटच्या आतमध्ये उभा असतांना त्याला गोळी लागल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र फडणवीस यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. मयत व्यक्ती हा दंगलीतच सहभागी होता. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी रबर बुलेट फायर केल्या होत्या, त्यात या व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचे फडणवीस म्हणाले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: