खबरदार! मापात पाप केल्यास होणार कारवाई, प्रशासनाकडून वजन मापांचे सर्वेक्षण मोहीम
Aurangabad : परवानाधारक दुरस्तकांच्या सहकार्याने वजने मापे उपयोगकर्ता व्यापारी वर्गाचे सर्वेक्षण करण्याची मोहिम हाती घेतली आहे.
औरंगाबाद : वैध मापन शास्त्र अधिनियम 2009 अन्वये अप्रमाणित वजन काट्याची विक्री अथवा व्यवहारामध्ये उपयोग करणे अवैध आहेत. मात्र, असे असताना काही दुकानदार आणि व्यापारी अप्रमाणित वजन काट्यांचा वापर करून ग्राहकांची फसवणूक केली जाते. त्यामुळे अशाप्रकारे मापात पाप करणाऱ्यांविरोधात आता कारवाई केली जाणार आहे. यासाठी, महाराष्ट्र राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिनस्त वैध मापन शास्त्र यंत्रणेने त्यांचे परवानाधारक दुरस्तकांच्या सहकार्याने वजने मापे उपयोगकर्ता व्यापारी वर्गाचे सर्वेक्षण करण्याची मोहिम हाती घेतली आहे. त्यामुळे, व्यापाऱ्यांनी सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या दुरस्ती परवानाधारकास सहकार्य करावे, असे आवाहन उपनयिंत्रक वैध मापन शास्त्र आर.डी.दराडे यांनी केले आहे.
वैध मापन शास्त्र यंत्रणेमार्फत वजने, मापे व तोलन उपकरणे यांच्या अचुकतेबाबतची पडताळणी केलेली वजने व मापे व तोलन उपकरणे वापरणे कायद्यान्वये बंधनकारक आहे. वजने व मापे याचा वैध विक्री परवाना असलेल्या परवानाधारकाने वजने, मापे व तोलन उपकरणे यांची विक्री करणे आवश्यक आहे. असे असताना देखील काही व्यापारी विविध देशातुन आयात केलेले (चीनी बनावटीचे) किंवा इतर राज्यातुन आणलेले इलेक्ट्रॉनिक्स काटे अनधिकृत व्यक्ती त्याचे स्टिकर वजन काट्यांना लावून अनधिकृतपणे विक्री करत आहेत, असल्याचे समोर आले आहेत. त्यामुळे आता औरंगाबाद जिल्ह्यात वजने मापे उपयोगकर्ता व्यापारी वर्गाचे सर्वेक्षण करण्याची मोहिम हाती घेतली आहे.
दरम्यान, अप्रमाणित इलेक्टानिक्स काट्याची विक्री अथवा वापर केल्याचे आढळून आल्यास वैध मापन शास्त्र अधिनियम 2009 व त्यांअंतर्गतच्या नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे, अप्रमाणित वजन काट्याची विक्री अथवा त्यांचा व्यवहारामध्ये उपयोग करु नये,अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याची माहिती उपनयिंत्रक वैध मापन विभागाकडून देण्यात आली आहे.
सर्वेक्षणाला सहकार्य करण्याचे आवाहन...
जिल्ह्यातील कार्यरत सर्व परवानाधारक दुरुस्तकांना वजने व मापे व तोलन उपकरणे यांचा वापर करणाऱ्या आस्थापकांना भेट देऊन सर्वेक्षण करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली. तसेच या जिल्ह्यातील संबंधित दुरस्ती परवाना धारकास वजने मापे व तोलन उपकरणे उपयोगकर्ता आस्थापनाचे सर्वेक्षणसाठी उपनियंत्रक, वैध मापन शास्त्र, जिल्हा कार्यालयाने प्राधिकर पत्र दिले आहे. त्यामुळे वजनमापे उपयोगकर्ता आस्थपनेमधील व्यापाऱ्यांनी सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या दुरस्ती परवानाधारकास सहकार्य करावे, असे आवाहन उपनयिंत्रक वैध मापन शास्त्र आर.डी.दराडे यांनी केले आहे. काही शंका असल्यास व्यापाऱ्यांनी 0240-2483818 या कार्यालयीन दरध्वनीक्रमांकावर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: