धक्कादायक! पत्नीसह पोटच्या मुलांना वडापावमधून दिलं विष, औरंगाबादमधील संतापजनक घटना
Aurangabad Crime News : या प्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Aurangabad Crime News : औरंगाबाद (Aurangabad) शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, पतीकडून पत्नीसह पोटच्या मुलांना वडापावमधून (Vada Pav) विष देऊन त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला असल्याचे बोलले जात असून, या प्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 16 ऑगस्ट रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास क्रांतीचौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, पोलिसांनी आता यात गुन्हा दाखल केला आहे.
'घरोघरी मातीच्या चुली' या म्हणीनुसार पती-पत्नीमध्ये होणारे वाद काही नवीन नाही. मात्र, हेच वाद चक्क आपल्या पत्नी आणि मुलांच्या जीव घेण्यापर्यंत जाण्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. क्रांती चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. तक्रारदार महिलेचे आणि तिचे पतीचे कौटुंबिक कारणावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. या वादातूनच तक्रारदार महिलेचा पती शेख इसाक याने आपले नातेवाईक शेख इब्राहीम, शेख युनूस शेख याकूब, फुरखान यांच्या मदतीने 16 ऑगस्टच्या रात्री वडापावमध्ये विष कालवून पत्नी आणि मुलांना खाण्यासाठी दिले होते. वडापावचा वास येत असल्याचे निदर्शनास आल्यावर तक्रारदार महिलेने आणि तिच्या मुलांनी वडापाव न खाता फेकून दिले. त्यानंतर त्यात काही तरी मिसळले असल्याचे स्पष्ट झाल्याने तिने पोलिसांत धाव घेत गुन्हा दाखल केला. त्यानंतर क्रांती चौक पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांत गुन्हा दाखल...
याप्रकरणी तक्रारदार महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पती शेख इसाक, नातेवाईक शेख इब्राहीम, शेख युनूस, शेख याकूब, फुरखान यांच्याविरूध्द क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार राठोड करीत आहेत.
अनेकांना धक्का...
अनेकदा पती-पत्नीमध्ये छोटा-मोठा वाद होतच असतो. अनेकदा कुटुंबातील इतर सदस्यांच्या मदतीने हे वाद मिटवले देखील जातात. खूपच झालं तर वाद मारहानीपर्यंत जातो.पण औरंगाबादच्या घटनेने खळबळ उडाली आहे. कुटुंबप्रमुख असलेल्या पतीनेच आपल्या पत्नीला व पोटच्या मुलांना विष घालण्यापर्यंतची इतकी टोकाची भूमिका उचलल्याने अनेकांना धक्का बसला आहे. कौटुंबिक कारणावरून थेट पोटच्या मुलांचा जीव घेण्याची हिम्मत येते तरी कुठून असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
पत्नीचे अनैतिक प्रेमसंबंध, पतीने उचललं टोकाचे पाऊल; औरंगाबाद सिल्लोडमधील धक्कादायक घटना