Kolhapur Crime : जप्त केलेला आयशर टेम्पो सोडण्यासाठी 50 हजारांची मागणी; कोल्हापुरात लाचखोर एपीआय, पीएसआयसह तिघांवर गुन्हा!
कोल्हापुरातील गांधीनगर पोलिस ठाण्यामधील एपीआय, पीएसआय आणि काॅन्स्टेबलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन अधिकारी आणि पोलिस शिपायावर गुन्हा दाखल झाल्याने कोल्हापूर पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
कोल्हापूर : जप्त केलेला आयशर टेम्पो परत देण्यासाठी आयशर मालकाच्या मित्राकडून 50 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी कोल्हापुरातील गांधीनगर पोलिस ठाण्यामधील एपीआय, पीएसआय आणि काॅन्स्टेबलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन अधिकारी आणि पोलिस शिपायावर गुन्हा दाखल झाल्याने कोल्हापूर पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
एपीआय, पीएसआयसह तिघांवर गुन्हा दाखल
या प्रकरणी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून दीपक शंकर जाधव, वय 44 वर्षे, सहा. पोलीस निरीक्षक, गांधीनगर पोलीस ठाणे, (सध्या रा. अर्थव ओंकार कॉप्लेक्स बापट कॅग्प कोल्हापूर, मुळ रा. पेठकिनाई, ता. कोरेगांव, जिल्हा सातारा) आबासाहेब तुकाराम शिरगारे, पोलीस उप निरीक्षक (सध्या रा. विठु माऊली अपार्टमेंट निगडेवाडी उचगांव, ता. करवीर जिल्हा कोल्हापूर मु. पो. उमरगा चिवरी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव उस्मानाबाद) आणि संतोष बळीराम कांबळे ( वय 33 वर्षे, पो. कॉ.ब.नं. 1828, गांधीनगर पोलीस ठाणे, रा. शिरोली हौसिंग सोसायटी, माळवाडी, शिरोली, ता. हातकणंगले जिल्हा कोल्हापूर) यांच्यावर गांधीनगर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार आणि त्यांचा मित्र जनावरे वाहतुकीचा व्यवसाय आहे. तक्रारदारासह त्यांच्या साथीदारावर गांधीनगर पोलीसात गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यात तक्रारदाराचा आयशर टेम्पो आहे. तक्रारदार जप्त केलेला टेम्पो सोडण्यासाठी आणि कोर्टात म्हणणे मांडण्यासाठी तपास अधिकारी पोलीस उप निरीक्षक शिरगीरे यांना 25 नोव्हेंबर रोजी भेटले होते. यावेळी तक्रारदाराकडे 30 हजार रुपयांची मागणी केली. तसेच त्यांच्या सहकाऱ्याला दिपक जाधव यांनी फोन करून गुन्ह्यात मदत करतो म्हणत 35 हजारांची मागणी केली. यानंतर लाचलूचपतकडे तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीची पडताळणी केली असता शिरगिरे यांनी तक्रारदाराला फोनवर पोलीस कर्मचारी कांबळेची भेट घेण्यास सांगितले होते. कांबळेची भेट घेतली असता कांबळेनं शिरगिरेंना समक्ष फोन केला. यावेळी शिरगिरेंच्या सांगणेवरून तक्रारदाराकडे पहिल्यांदा 20 हजार आणि तडजोड करून 15 हजारांची मागणी केली. दीपक जाधव यांनी तक्रारदार अटकेत असताना सदर गुन्ह्यात मदतीसाठी पैसे घेतलेची कबुली देत व गुन्ह्यात मदत करतो असे सांगत उर्वरित 35 हजारांची मागणी केली. तसेच गाडी सोडण्यासाठी शिरगिरेंना 10 हजार मागितल्याचे निष्पन्न झाले.
सदरची कारवाई शिरीष सरदेशपांडे, पोलीस उपआयुक्त/पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे. विजय चौधरी, अपर पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्यूरो, पुणे यांचे तसेच वैष्णवी पाटील, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. कोल्हापूर मार्गदर्शनानुसार बापू साळुंके, पोलीस निरीक्षक व पथक अॅन्टी करप्शन ब्युरो, कोल्हापूर यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या