(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तारीख पे तारीख! अखेर आज सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला येणार; टाईम बॉन्ड देण्याची शक्यता
सरकारचं शिष्टमंडळ आज (9 नोव्हेंबर) मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून आपल्याला मिळाली असल्याचं खुद्द जरांगे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितलं.
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि अंतरवाली सराटीमधील ठरलेल्या गोष्टींबाबत चर्चा करण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची भेट घेणार आहे. आत्तापर्यंत तीनदा मुहूर्त हुकल्यावर हे शिष्टमंडळ आज छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरात पोहचणार आहे. विशेष म्हणजे या भेटीत शिष्टमंडळाकडून जरांगे यांना टाईम बॉन्ड दिलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनोज जरांगे आणि सरकारचं शिष्टमंडळ यांच्यातील आजची भेट महत्त्वाची समजली जात आहे.
सरकारचं शिष्टमंडळ आज (9 नोव्हेंबर) मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून आपल्याला मिळाली असल्याचं खुद्द जरांगे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यानुसार हे शिष्टमंडळ थेट मुंबईहून छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर दाखल होतील. तेथून जरांगे उपचार घेत असलेल्या रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतील. या शिष्टमंडळात जरांगे पाटील यांच्या भेटीला सरकारचे शिष्टमंडळ जाणार आहे.चार मंत्र्यांचे शिष्टमंडळ भेट घेणार आहे. या शिष्टमंडळात मंत्री उदय सामंत, शंभूराजे देसाई, धनंजय मुंडे, संदीपान भुमरे आणि अतुल सावे यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.
तीनदा मुहूर्त हुकला...
सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी येणार असल्याची गेल्या तीन दिवसांपासून चर्चा आहे. सुरुवातीला 6 नोव्हेंबर रोजी हे शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीसाठी येणार असल्याचं सांगण्यात आलं. मात्र, पहिल्या दिवसाचा हा मुहूर्त टळला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच, 7 नोव्हेंबरला सरकारचं शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीला येणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातून सांगण्यात आलं. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगर दौऱ्यावर असल्याने, पुन्हा एकदा सरकारच्या शिष्टमंडळाचा दौरा देखील रद्द करण्यात आल्याची माहिती जरांगे यांनी दिली. तर, दोनदा मुहूर्त हुकल्यानंतर 8 नोव्हेंबरला हे शिष्टमंडळ शंभर टक्के येणार असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयातून आपल्याला कळालं असल्याचं जरांगे म्हणाले. मात्र 8 नोव्हेंबरला देखील हे शिष्टमंडळ संभाजीनगरात पोहोचलच नाही. आता पुन्हा आजचा वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे तीनदा मुहूर्त हुकलेलं शिष्टमंडळ किमान चौथ्या दिवशी तरी जरांगे यांच्या भेटीला येणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणाबाबत आमचे काम, आंदोलनाची पुढची दिशा याबाबत काम सुरू असल्याचे सांगितले. सरकार ही जोरात काम करत असून ते त्यांच्या शब्दावर ठाम असल्याचे जरांगे यांनी म्हटले.
हे ही वाचा :
शिक्षण, नोकऱ्यांसह राजकीय आरक्षण सुद्धा घेणार?; आतापर्यंतचं जरांगेंचं सर्वात मोठं वक्तव्य