(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जाळपोळप्रकरणी अटक केलेले समाजकंटकचं, त्यांच्या जातीशी देणेघेणे नाही; जरांगेंच्या आरोपावर बीड पोलिसांचा खुलासा
Manoj Jarange Patil : ओबीसी नेते पोलिसांवर दबाव आणून मराठा समाजातील तरुणांना खोट्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे.
Beed News : बीडमध्ये दगडफेक आणि जाळपोळ झाली असून, यामध्ये अटक केलेले आरोपी हे समाजकंटक आहेत. त्यामुळे ते कोणत्या समाजाचे आहेत याच्याशी पोलिसांचे काही संबंध नाही. आम्ही फक्त जाळपोळ आणि दगडफेक करणाऱ्या लोकांना अटक करत आहोत. तसेच ते आमच्यासाठी फक्त आरोपी आहेत, अशी प्रतिक्रिया बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केलेल्या आरोपावर बीड पोलिसांनी (Beed Police) आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
बीड जिल्ह्यात झालेल्या जाळपोळ आणि दगडफेकीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच जाळपोळीच्या घटनेत छगन भुजबळ यांचे समर्थक तथा समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष ॲड. सुभाष राऊत यांचे जालना रोडवरील सनराईज हॉटेलला आग लावण्यात आली होती. त्यानंतर, काल छगन भुजबळ यांनी या हॉटेलची पाहणी केली. मात्र, सुभाष राऊत यांच्या हॉटेलची जाळपोळ करणारे भुजबळ यांचेच नातेवाईक असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. तसेच, बीडच्या दौऱ्यावर असतांना भुजबळ यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन मराठा समाजातील मुलांचे नावं देऊन त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे. जरांगे यांच्या आरोपानंतर बीड पोलीस अधीक्षकांची प्रतिक्रिया समोर येत आहे. "आम्ही कुठल्याही समाजाच्या तरुणांवर कारवाई करत नसून, आमच्यासाठी जाळपोळ आणि दगडफेक करणारे फक्त आरोपी असल्याचे पोलीस अधीक्षक ठाकूर म्हणाले आहेत.
काय म्हणाले जरांगे?
ओबीसी नेते पोलिसांवर दबाव आणून मराठा समाजातील तरुणांना खोट्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. बीड पोलिसांनी घाबरायची गरज नाही. बीड पोलिसांच्यामागे मराठा समाज उभा आहे. जे दबाव तंत्र सुरू आहे, ते थांबल तर बरं होईल. अन्यथा जो निर्णय उशिरा घ्यायचा आहे तो आता घेऊ अशा इशारा देखील जरांगे पाटील यांनी दिला आहे.
आरोपींमध्ये बिगरमराठा तरुणांचा समावेश...
बीडमधील जाळपोळ पूर्वनियोजित कट असल्याची शक्यता समोर येत आहे. जाळपोळ पूर्वनियोजित असू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या तपास अहवालात ही शक्यता वर्तवली आहे. कारण जाळपोळ करणारे बीड परिसरासोबत तालुक्याच्या बाहेरचे असल्याची माहिती समोर आली आहे. बहुतांशी तरुण 25 वयोगटाच्या खालचे असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान जाळपोळीचा प्रकार मराठा समाज किंवा स्थानिकांनी केला नसून काही समाजकंटकांनी केला असावा, असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी म्हटले होते. विशेष म्हणजे बीड शहरात अटक करण्यात आलेल्या 42 तरुणापैकी 10 पेक्षा जास्त तरुण बिगरमराठा असल्याचे देखील समोर आले होते.
इतर महत्वाच्या बातम्या:
बीडमधील हिंसाचारात भुजबळांचे नातेवाईक, त्यांनीच हॉटेलची तोडफोड केली; जरांगेंचा गंभीर आरोप