Chhatrapati Sambhaji Nagar News : आर्थिक फसवणूक झाल्याने तरुणाने चाकूने गळा कापून केली आत्महत्या; संभाजीनगरमधील घटना
Chhatrapati Sambhaji Nagar : वारंवार पैसे मागितल्यावर जिवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने हतबल झालेल्या तरुणाने अखेर आत्महत्या केली आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) उस्मानपुरा पोलीस ठाणे हद्दीतील श्रेयनगरच्या झांबड इस्टेट येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, आर्थिक फसवणूक झाल्याने एका तरुणाने चाकूने गळा कापून केली आत्महत्या (Suicide) केली आहे. कटलरीचा होलसेल व्यापार करणाऱ्या या तरुणाला दारूच्या व्यवसायात भागीदारी केल्यास दहा टक्क्याने परतावा देतो म्हणत 70 लाख रुपये उकळण्यात आले होते. अनेकदा पैसे मागून मिळत नव्हते, त्यातच वारंवार पैसे मागितल्यावर जिवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने हतबल झालेल्या या तरुणाने अखेर आत्महत्या केली आहे. महेंद्रकुमार संजय गुंगे (वय 30, रा. श्रेयनगर, झांबड इस्टेट) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तर या प्रकरणी अमित जगदीश खट्टर (रा. पुंडलिक नगर), जगदीश खट्टर (रा. जालना), भानुदास सोनवणे (रा. मुकुंदवाडी) यांच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी मृत महेंद्रकुमार गुंगे यांच्या आई रत्नप्रभा संजय गुंगे यांनी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात त्यांनी म्हटले आहे की, महेंद्रकुमार गुंगे हे कटलरीचे होलसेल व्यापारी होते. सोबतच ते कन्स्ट्रक्शनची कामेही करीत होते. दरम्यान काही वर्षांपूर्वी महेंद्रकुमार यांची त्यांचा मित्र बबलू पांगरकर याने मेबिन नावाच्या व्यक्तीसोबत ओळख करून दिली. पुढे मेबिनने दारूच्या व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी महेंद्रकुमार यांची अमित खट्टरसोबत ओळख करून दिली होती. पुढे अमित आणि महेंद्रकुमार यांच्यात चांगलीच ओळख झाली. खट्टरने दहा टक्के नफा देण्याचे आमिष दाखवून महेंद्रकुमार यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे त्याने सुरुवातीला दहा हजार रुपयांप्रमाणे परतावा देखील दिला. त्यामुळे महेंद्रकुमार यांचा विश्वास अधिक वाढला आणि त्यांनी तब्बल 70 लाख रुपये गुंतविले. पण 2021 मध्ये अमित खट्टर जेलमध्ये गेला.
"मर्डर होण्यापेक्षा तूच आत्महत्या कर"
अमित खट्टर जेलमध्ये गेल्यावर परतावा बंद झाला. त्यामुळे भागीदारी तोट्यात जाऊ लागली. म्हणून महेंद्रकुमार याच्याकडून आपले पैसे परत देण्याची मागणी होऊ लागली. मात्र अमितचे वडील जगदीश खट्टर याने महेंद्रकुमार यांच्यासह त्यांच्या आईला पैसे मागितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. तर अमित खट्टर याने महेंद्रकुमारची कारही बळकावली. ही कार परत करण्यासाठी तो दहा लाख रुपये मागत होता. विशेष म्हणजे महेंद्रकुमार यांनी पैसे मागितले, तर त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या देत होते. वारंवार हा प्रकार झाल्यावर आमच्या हातून मर्डर होण्यापेक्षा तूच आत्महत्या कर, असे जगदीश खट्टर म्हणाला होता.त्यामुळे शेवटी हतबल झालेल्या महेंद्रकुमार याने स्वतःच चाकूने गळा कापून आत्महत्या केली असल्याचं तक्रारीत म्हटले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
