इम्तियाज जलील यांनी दंड थोपटले, 24 तारखेला भरणार उमेदवारी अर्ज, संभाजीनगरात तिहेरी लढत पक्की!
इम्तियाज जलील हे येत्या 24 तारखेला संभाजीनगरमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी ते मोठे शक्तिप्रदर्शन करणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर : संपूर्ण देशासह राज्यातही सध्या लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) धूम आहे. वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार जोमात प्रचार करत आहेत. एमआयएम पक्षानेही संभाजीनगरातून (Chhatrapati Sambhajinagar) विद्यमान खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांना तिकीट दिले आहे. त्यांनी गेल्या काही वर्षांत खासदार असताना मतदारसंघाची चांगल्या प्रकारे बांधणी केली आहे. यावेळीदेखील ते पुन्हा एकदा विजयी कामगिरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. दरम्यान, ते येत्या 24 तारखेला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. जलील यांच्या उमेदवारीमुळे संभाजीगरात तिहेरी लढत होणार असून, येथून कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.
24 तारखेला भरणार उमेदवारी अर्ज
जलील यांनी आज (21 एप्रिल) पत्रकार परिषद घेऊन, स्वत:च्या उमेदवारीविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी यावेळी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मंत्री संदिपान भुमरे यांना या मतदारसंघातून तिकीट दिले आहे. त्यांच्या उमेदवारीची नुकतीच घोषणा करण्यात आली. यावर बोलताना मी भुमरे यांचं स्वागत करतो, असं जलील म्हणाले. तसेच येत्या 24 एप्रिल रोजी मी संभीजनगर शहरातील भडकल गेटपासून एक रॅली काढणार आहे. या रॅलीनंतर मी माझा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, अशी माहितीही जलील यांनी दिली. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्याच दिवशी ते हर्सूल रोडच्या बाजूला प्रचार कार्यकाय सुरू करणार आहेत.
जलील अमरावतीत आनंदराज आंबेडकरांचा प्रचार करणार
रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर हे अमरावतीतून निवडणूक लढवत आहेत. आनंदराज यांना एमआयएमने पाठिंबा दिला आहे. त्यांच्या प्रचारार्थदेखील जलील येत्या 23 एप्रिल रोजी अमरावतीत जाणार आहेत.
235 रुपये चोरी केल्याचा खटला
जलील यांनी त्यांच्यावर असलेल्या खटल्यांविषयीही यावेळी भाष्य केलं. राजकारणात येण्यापूर्वी माझ्याविरोधात एकही केस नव्हती. गेल्या 10 वर्षांत माझ्याविरोधात 12 केसेस झाल्या. माझ्यावर चालू असलेल्या खटल्यांची माहिती लोकांना समजावी म्हणून मी ही माहिती देत आहे. एक केसमध्ये तर मी दारुचे दुकान बंद करण्यासाठी गेलो असता, 235 रुपयांची चोरी केल्याचा आरोप आहे. भारनियमनाच्या विरोधात मी आंदोलन केले होते. हे आंदोलन केले म्हणूनदेखील माझ्याविरोधात खटला दाखल करण्यात आला. करोना काळात माझ्याविरोधात एक गुन्हा दाखल करण्यात आला. माझ्यावर अशा एकूण 12 केसेस आहेत, असे जलील म्हणाले.
संभाजीनगरात तिहेरी लढत
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघातून शिवसेना (शिंदे गट) या पक्षाने मंत्री संदिपान भुमरे यांना तिकीट दिलंय. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेही चंद्रकांत खैरे यांना तिकीट दिले आहे. खैरे हे महाविकास आघाडी तर भुमरे हे महायुतीचे उमेदवार असतील. या मतदारसंघात तिहेरी लढत होणार आहे. खैरे आणि भुमरे यांच्यात मतांचे विभाजन झाल्यास, येथून जलील पुन्हा एकदा निवडून येऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला जातोय.
हेही वाचा :
उपराजधानीत मतदानाचा टक्का का घटला? दस्तूरखुद्द पंतप्रधानांनी धरले भाजप पदाधिकाऱ्यांना धारेवर