निसर्गाने आपल्याला शरीर दिलं. शरीरामध्ये आपलं सगळ्यात जास्त प्रेम कशावर असतं? ज्याची सतत आपण काळजी घेत असतो.. अर्थातच चेहरा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण कसे दिसतोय याचं भान आपण कायम बाळगत असतो. प्रश्न फक्त दिसण्याचा नाहीच. आपली मनस्थिती कशी आहे.. आपण आतून आनंदी आहोत की आत कोणती एखादी वेदना सतावते आहे, हेही पहिल्यांदा दिसतं ते चेहऱ्यावर. म्हणूनच तुम्ही कसे आहात यापेक्षा तुम्ही कसे दिसता याला जास्त महत्व दिलं जातं. दिसण्यावर अर्थातच अधिक प्रेम असतं तं स्त्रीचं. सौंदर्यशास्त्रच ते. पण अचानक एक दिवस येतो आणि काही ध्यानीमनी नसताना हा चेहरा एका मानवी विकृतीचा बळी ठरतो. का होत असावं असं? असं झाल्यानंतर त्या तरल, निष्पाप मनाचं काय होत असेल? समाजामध्ये.. सार्वजनिक ठिकाणी त्या मुलीला वा महिलेला कशी वागणूक दिली जात असेल? असं विकृत कृत्य केल्यानंतर संबंधित गुन्हेगाराला काय शिक्षा होत असेल? खरंतर आपण या सगळ्या गोष्टींच्या खोलात जात नाही. कारण, ती समस्या आपल्या दारापर्यंत आलेली नसते. ज्या कुटुंबाला या दिव्यातून जावं लागतं त्यांच्या मानसिकतेची कल्पानाही करवत नाही. कारण आपली ती पोच नसतेच. मेघना गुलजार या दिग्दर्शिकेला हीच मानसिकता समोर आणायची असावी. म्हणूनच तिने छपाक बनवायला घेतला. सिनेमाचं नाव छपाक का? कारण कोणीतरी येतो आणि एक दिवस अचानक छपाक करुन एसिड हल्ला करून जातो आणि त्या मुलीचं जगणं बदलतं... कायमचं. हा बदल कसा असतो.. त्या बदलाची ही गोष्ट आहे.

तलवार, फिलहाल, राझी असे सिनेमे केल्यानंतर मेघना यांनी छपाक करायला घेतला. लक्ष्मी अगरवालची गोष्ट त्यांनी घेतली. तिच्यावर हा हल्ला झाल्यानंतर तिचं आयुष्य कसं बदललं.. ती यातून कशी उभी राहिली.. तिने कोणता वसा घेतला त्याची ही गोष्ट आहे. सिनेमात सर्व व्यक्तिरेखांची नावं बदलली आहेत. शिवाय काही सिनेमॅटिक लिबर्टीही घेण्यात आली आहे. अर्थात ही लिबर्टी घेण्यामध्येही सकारात्मकता आहे हे विशेष.

एसिड हल्ला झाल्यानंतर त्या हल्ल्याची बळी ठरलेल्या मुलीचं भावविश्व चितारताना अनेक महत्वाच्या गोष्टींना स्पर्श करण्यात आला आहे. आपल्याकडे असलेलं 326 कलम.. त्याची असलेली शिक्षा.. एसिड हल्ला केलेल्याला देण्यात येणारी शिक्षा वाढावी म्हणून होणारे प्रयत्न.. आदी अनेक गोष्टी यानिमित्ताने प्रकाशात येतात. एसिडच्या खुलेआम होणाऱ्या विक्रीलाही इथे अधोरेखित करण्यात आलं आहे. या पटकथेला पुरेपूर न्याय दिला आहे तो दीपिका पदुकोण आणि विक्रांत मेसे यांनी. या सिनेमातल्या इतर व्यक्तिरेखाही तितक्याच महत्वाच्या आणि लक्षात राहणाऱ्या.


आजवर असा विषय कुणी घेतला नव्हता. समाजाला सतत पोखरणाऱ्या विकृत मानसिकतेवर कुणी बोट ठेवलं नव्हतं. ते या दिग्दर्शकाने ठेवलं आहे. चित्रपटाचा उत्तरार्ध आणि शेवट कमाल अंगावर येणारा. हा विषय मांडण्याचं धाडस या टीमने केल्याने त्यांचं अभिनंदन करायला हवं. या संपूर्ण सिनेमाला कारुण्याची झालर आहे. हल्ला झाल्यानंतर उभी राहणारी मालती रडताना कुठेतरी हळहळ. हे कृत्य करणाऱ्याबद्दल संताप धुमसत राहतो. त्याचवेळी चेहरा बदलला तरी मनाने या मुलींचं असलेलं टपोरं मन लख्ख समोर येतं. हेच या सिनेमाचं यश आहे.

पिक्चरबिक्चरमध्ये या सिनेमाला मिळतायत साडेतीन स्टार्स. हा सिनेमा पाहायला हवा. विषय गंभीर असला तरी कुठे थांबायचं आणि किती दाखवायचं याचं भान दिग्दर्शिकेला असल्यामुळे हा सिनेमा रंजन करतो आणि डोळ्यात अंजनही घालतो.


संबंधित बातम्या