मुंबई : दिल्लीच्या जेएनयूतील विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीनंतर आंदोलनात अभिनेत्री दीपिका पादूकोण सहभागी झाल्यानंतर सोशल मीडियावर तिच्या आगामी 'छपाक' चित्रपटावर बहिष्कार टाकण्याबाबत मोहीम सुरु झाली. त्यात भर म्हणून चित्रपटात दीपिकाच्या व्यक्तिरेखेवर अॅसिड टाकणाऱ्या मुख्य आरोपीचा धर्म बदलल्याचा आरोप करण्यात येत आहे. तशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'छपाक' सिनेमा हा अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवालच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटात दीपिकाच्या व्यक्तिरेखेचं नाव मालती आहे. खऱ्या आयुष्यात लक्ष्मी अग्रवालवर अॅसिड टाकणाऱ्या आरोपीचं नाव नदीम खान होतं आणि चित्रपटात त्याचं नाव राजेश करण्यात आल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत होती. पण चित्रपटात असं काही नसून अॅसिड टाकणाऱ्या व्यक्तिरेखेचा उल्लेख वास्तवातील नावाशी साधर्म्य दाखवतो.

व्हायरल फोटो

व्हायरल फोटो

'छपाक'चा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला त्यावेळी सगळ्याच स्तरातून दीपिका आणि मेघना गुलजारचं कौतुक झालं होतं. संवेदनशील विषय हाताळल्यामुळे दोघींवरही स्तुतीसुमनं उधळली जात होती. अगदी काही दीपिकाने जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला करण्याआधीपर्यंत तिचं कौतुक सुरु होतं. मात्र दोन दिवसांपूर्वी दीपिकाने जेएनयूमध्ये उपस्थिती लावली आणि जेएनयूएसयूची अध्यक्ष आयशी घोषची विचारपूस केली. मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. परंतु त्यानंतर सोशल मीडियावर 'छपाक'वर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरु झाली होती. दुसरीकडे दीपिकाला पाठिंबा देण्याबाबतही हॅशटॅग ट्रेण्ड झाला होता.

दरम्यान, मेघना गुलजार दिग्दर्शित अभिनेत्री दीपिका पादूकोणचा 'छपाक' चित्रपट उद्या म्हणजे 10 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

संबंधित बातम्या

#JNU Attack : अभिनेत्री दीपिका पादुकोण जखमी विद्यार्थ्यांच्या भेटीला; विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आईशा घोषची घेतली भेट

'छपाक'च्या रिलीजचा मार्ग मोकळा; सिनेमाच्या प्रदर्शनावरील स्थगितीची मागणी याचिकाकर्त्यांनी घेतली मागे

छपाक' विरोधात हायकोर्टात याचिका निव्वळ पैसे उकळण्यासाठी, मेघना गुलझार यांचा हायकोर्टात आरोप