औरंगाबाद : शिवसेनेमध्ये नाराज असलेले आमदार तानाजी सावंत यांची नाराजी संपायचे नाव घेत नाही. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या मराठवाड्याच्या बैठकीला नाराज आमदार तानाजी सावंत यांनी दांडी मारली आहे. आपला मतदारसंघ असलेल्या उस्मानाबाद संदर्भातील शासकीय बैठकीलाही तानाजी सावंत अनुपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसीय दौऱ्यावर मराठवाड्यातील जिल्हानिहाय अधिकऱ्यांसोबत बैठका लावल्या आहेत. मात्र काल जिल्हा परिषद निवडणुकीत बंडखोरी केल्यानंतर तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या सूचना झुगारून बैठकीकडे पाठ फिरवली आहे.


दरम्यान, काल झालेल्या एक दिवसीय अधिवेशनाला तानाजी सावंत यांनी दांडी मारली होती. त्यांच्यासोबत उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले देखील नाराज असल्याचे बोलले जात आहे. मात्र चौगुले यांनी तानाजी सावंत हे गैरहजर असल्याचे कारण माहित नाही, वरिष्ठांना विचारा असं म्हणत सावंत यांच्या नाराजीवर बोलणं टाळलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उस्मानाबाद जिल्ह्याची महत्त्वाचे आढावा बैठक आज औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली.
शिवसेनेच्या दोन नाराज आमदारांकडून जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचाच पराभव?  

शिवसेनेचे माजी मंत्री असलेले तानाजी सावंत हे मंत्रिपद न मिळाल्याने नाराज आहेत. ते काल विशेष अधिवेशनाला देखील उपस्थित नव्हते. काल जिप अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत तानाजी सावंत यांनी भाजपला साथ देत उस्मानाबाद जिल्हा परिषदेमध्ये आपल्या पुतण्याला उपाध्यक्ष केलं. तानाजी सावंत यांनी महाआघाडीच्या उमेदवारांसाठी मतदान करावं असा आदेश खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देऊनही तानाजी सावंतांनी तो ऐकला नाही. एवढेच नाही तर मातोश्री वरून आलेले फोनही घेतले नाहीत.

राज्यात तीन पक्षांच्या महाआघाडीचे सरकार आलं. मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे बसले. तरीही शिवसेनेच्या आमदारांना पूर्वी जशी शिवसेनेची, ठाकरे कुटुंबीयांची भीती वाटायची तसं होताना दिसत नाही. आमदार सावंतांसह उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे दुसरे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्याही गटाने भाजपला मदत केली असल्याचे बोलले जात आहे.


जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या तानाजी सावंतांचं बंड, भाजपशी घरोबा  

जिल्हा परिषदेची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ही तुलनेने लहान पदं. या लहान पदासाठी सुद्धा तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरेंचा आदेश डावलला. त्याचं कारण आहे तानाजी सावंतांची नाराजी. मंत्रिपद न मिळाल्यामुळे तानाजी सावंत पक्षावर नाराज आहेत. त्यांची मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्याशी बाचाबाची झाल्याची चर्चा आहे.

राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त आणि चिंतामुक्त करणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजपासून दोन दिवसाच्या औरंगाबाद दौऱ्यावर असून ते दोन दिवस औरंगाबाद सह, लातूर ,उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्यातील बळीराजाला कर्जमुक्त आणि चिंतामुक्त करण्याचं आश्वासन दिलं आहे. शिवाय, राज्यात येऊ घातलेल्या नव्या प्रकल्पात कामगार निर्मितीसाठी कौशल्य विकास केंद्रही उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.