काही महिन्यांपूर्वी 'छपाक' चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. त्यामधील मुख्य अभिनेत्री दीपिका पादूकोण आहे अनेकांना पटलं नव्हतं, असा तिचा लूक होता. पोस्टरमध्ये दीपिका अॅसिड हल्ला पीडितेच्या रुपात दिसत होती. तिचा हा लूक पाहून चाहते निशब्द झाले होते. आता या ट्रेलरमध्ये दीपिकाने आपल्या अभिनयाची कमालही दाखवली आहे.
'तलवार' आणि 'राझी'सारखे संवेदनशील आणि सत्य घटनेवर आधारित चित्रपट बनवणाऱ्या मेघना गुलजार यांनी 'छपाक'चं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमाचं चित्रीकरण दिल्ली आणि मुंबईत झालं आहे.
या चित्रपटाची कथा लक्ष्मी अगरवाल या अॅसिड हल्ला पीडित तरुणीच्या जीवनावर आधारित आहे. दीपिकासोबत या चित्रपटात विक्रांत मेसी हा देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. हा सिनेमा अजय देवगणच्या 'तानाजी द अनसंग वॉरिअर' या चित्रपटासोबतच म्हणजेच 10 जानेवारी 2020 मध्ये प्रदर्शित होणार आहे.
दीपिका पादूकोण याआधी पद्मावत या सिनेमात झळकली होती. त्यामुळे मोठ्या काळानंतर आता 'छपाक'च्या माध्यमातून ती मोठ्या पडद्यावर पुन्हा दिसणार आहे.
कोण आहे लक्ष्मी अगरवाल?
2005 मध्ये एकतर्फी प्रेमवीराने लक्ष्मी अगरवालवर अॅसिड हल्ला केला होता. प्रेमाचा स्वीकार न केल्याच्या रागातून त्याने हे कृत्य केलं होतं. अॅसिडमुळे लक्ष्मीचा चेहरा पूर्णत: बिघडला. चेहर खराब झाल्यानंतर लक्ष्मी खचली नाही. तिने कायदेशीर लढाई लढली. लक्ष्मीच्या बुलंद इराद्यांमुळे छोट्या दुकानांमध्ये अॅसिड आणि केमिकलच्या विक्रीबाबत कठोर कायदा बनला.