मुंबई : मला वाटतं आपल्याकडे सौंदर्याची व्याख्या चुकीची बनली आहे. कारण, ज्या लक्ष्मीची भूमिका मी चित्रपटात साकारतेय ती खूप सुंदर आहे, अशी प्रतिक्रिया बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने 'एबीपी माझा'च्या विशेष मुलाखतीत दिली. अॅसिड हल्ल्यातील पीडितांना सर्वसामान्यपणे लोकांनी स्वीकारावं, असं मला वाटतं म्हणूनच मी हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतला, असंही ती म्हणाली.

अॅसिड हल्ल्यातील मुलीच्या कथेवर आधारित 'छपाक' हा दीपिका पदुकोणचा चित्रपट पुढील वर्षी 10 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. या पार्श्वभूमीवर मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दीपिकाशी गप्पा मारल्या. यावेळी चित्रपटातील अनेक किस्से दीपिकाने उलगडून सांगितले. अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालच्या जीवनावर आधारित 'छपाक' या चित्रपटात दीपिकाने लक्ष्मीची भूमिका साकारली आहे. अॅसिड हल्ल्यातील अनेक प्रकरणात गुन्हा दाखल होत नाही. मात्र, याचं प्रमाण अधिक असल्याचं या चित्रपटाच्या माध्यमातून लक्षात आल्याचे दीपिकाने सांगितलं.

हा चित्रपट स्वीकारताना मी लोकांचा विचार केला नाही. कारण, लोकांनी आतापर्यंत मला फक्त ग्लॅमरस लूकमध्येच पाहिलं आहे. मात्र, पहिल्यापासूनच मला चौकटीबाहेरच्या भूमिका करायला आवडतं. त्यामुळेच मी एकदाही विचार केला नाही की लोक माझ्याबद्दल काय विचार करतील. मला वाटतं आपल्याकडे सौंदर्याची व्याख्या लोकांनी ठरवून ठेवली आहे. त्याच व्याख्येला मला छेद द्यायचा होता. अॅसिड हल्ल्यातील मुली देखील आपल्यासारख्याच आहेत. मात्र. समाज त्यांना सामान्यपणे स्वीकारायला धजावत नाही. आपल्या देशात अॅसिड हल्ल्याच्या अनेक घटना घडतात. पण, दुर्दैवाने त्या सर्वांचीच नोंद होत नाही. आपल्या समाजात याबद्दल प्रबोधनाची कमतरता आहे आणि सिनेमा असं माध्यम जे सर्वांपर्यंत लवकरच पोहोचू शकतं. म्हणूनच मी हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतल्याचे दीपिकाने सांगितले.

हेही वाचा - Chhapaak Trailer | अंतर्मन हेलावणारा 'छपाक'चा ट्रेलर रिलीज

अंतर्मन हेलावणारा 'छपाक'चा ट्रेलर रिलीज -
काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरला शानदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे. देशात मुलींवर, महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये अॅसिड हल्ल्याचीही गणना होते. अशाच एका अॅसिड हल्ल्याच्या वेदना सहन करुन पुन्हा सावरणाऱ्या तरुणीची कहाणी म्हणजे 'छपाक'.

कोण आहे लक्ष्मी अगरवाल?
2005 मध्ये एकतर्फी प्रेमवीराने लक्ष्मी अगरवालवर अॅसिड हल्ला केला होता. प्रेमाचा स्वीकार न केल्याच्या रागातून त्याने हे कृत्य केलं होतं. अॅसिडमुळे लक्ष्मीचा चेहरा पूर्णत: बिघडला. चेहर खराब झाल्यानंतर लक्ष्मी खचली नाही. तिने कायदेशीर लढाई लढली. लक्ष्मीच्या बुलंद इराद्यांमुळे छोट्या दुकानांमध्ये अॅसिड आणि केमिकलच्या विक्रीबाबत कठोर कायदा बनला.

संबंधित बातम्या

'बेटी बचाओ, बेटी पढाओ' मोहिमेतून परिणीती चोप्राची हकालपट्टी केल्याच्या बातमीचं सत्य

दबंग 3 च्या कमाईपेक्षा नागरिकता कायद्याविरोधी आंदोलन महत्वाचं : सोनाक्षी सिन्हा

Chhapaak | छपाक सिनेमाच्या पार्श्वभूमीवर दीपिकाशी सोनाली कुलकर्णीने साधलेला खास संवाद | ABP Majha