मुंबई : दीपिकाच्या 'छपाक' या आगामी सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला असून ठरल्याप्रमाणे हा सिनेमा येत्या शुक्रवारी म्हणजेच 10 जानेवारीला सर्वत्र रीलिज होणार आहे. एका सत्य घटनेवर आधारीत सिनेमाच्या कथेवर कॉपीराईट कसा? असू शकतो असा सवाल करत हायकोर्टानं याचिकाकर्त्यांना कोणताही तातडीचा दिलास देण्यास नकार देत असल्याचं स्पष्ट करताच याचिकाकर्त्यांनी सिनेमाच्या रीलिजवरील स्थगितीची मागणी मागे घेत असल्याचं कोर्टाला कळवलं. मात्र प्रदर्शनानंतर कथेतील इतर घटनांशी साधर्म्य आढळल्यास पुन्हा कोर्टात दाद मागण्याचा याचिकाकर्त्यांचा अधिकार कायम ठेवत न्यायमूर्ती एस. सी. गुप्ते यांनी याप्रकरणाची सुनावणी सहा आठवड्यांसाठी तहकूब केली.


दरम्यान ही याचिका तथ्यहीन असून ती केवळ निर्मात्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या हेतूनंच दाखल करण्यात आली आहे. मुळात सत्यघटनेवर आधारीत कथा असताना त्यावर कुणीही आपला अधिकार सांगूच शकत नाही. त्यामुळे ही याचिका फेटाळून लावावी अशी मागणी सिनेमाच्या निर्मात्या आणि दिग्दर्शक मेघना गुलझार यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या आपल्या प्रतिज्ञापत्रातून केली आहे.


पाहा व्हिडीओ : छपाक सिनेमाच्या पार्श्वभूमीवर दीपिकाशी सोनाली कुलकर्णीने साधलेला खास संवाद



अॅसिड हल्यासारख्या भयानक घटनेतून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवाल यांची कहाणी सांगणाऱ्या दीपिका पादुकोणच्या आगामी छपाक या सिनेमाविरोधात लेखक राकेश भारती यांनी आपली नोंदणीकृत कथा चोरून निर्मात्यांनी हा सिनेमा बनवल्याचा आरोप करत कॉपीराईट कायद्याअंतर्गत हायकोर्टात धाव घेतली आहे. छपाकची मूळ संकल्पना आणि कथा आपली असून त्याबाबतची रितसर नोंदणीही 'इंडियन मोशन पिक्‍चर्स असोसिएशन' (इंपा)कडे करण्यात आली आहे. 'ब्लॅक डे' या नावानं फेब्रुवारी 2015 मध्येच ही नोंदणी केली होती, असा दावा राकेश भारती यांनी आपल्या याचिकेत केला आहे. यावर सिनेमा बनविण्यासाठी आपण अनेक कलाकार आणि निर्मात्यांकडे चर्चा केली होती. ज्यामध्ये फॉक्‍स स्टार स्टुडिओचाही समावेश होता. मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे या सिनेमाचं काम होऊ शकतं नाही, असं आपल्याला सांगण्यात आलं. मात्र आता याच पटकथेवर फॉक्‍स स्टारचा हा सिनेमा येत असल्याचं कळताच धक्का बसला. त्यामुळे कंपनीकडे याबाबत तक्रार केली, मात्र त्यांनी काहीच दाद न दिल्यामुळे हायकोर्टात दाद मागितल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे.


निर्मात्यांनी लेखकांच्या यादीमध्ये आपल्याला श्रेय द्यावे, अन्यथा सिनेमाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणावी, अशी प्रमुख मागणी त्यांनी कोर्टाकडे केली आहे. आवश्‍यकता वाटल्यास छपाकची पटकथा आणि आपली पटकथा जाणकारांकडून तपासावी, अशीही मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. गेल्या महिन्यात ही याचिका हायकोर्टात दाखल झाली होती. मात्र याचिकाकर्त्यांचा हा दावा कायद्यात बसणारा नसून निव्वळ सवंग प्रसिद्ध आणि कॉपीराईटच्या नावाखाली निर्मात्यांकडून पैसे उकळण्याच्या उद्देशानं ही याचिका दाखल केल्याचा आरोप करण्यात आला आहे.


संबंधित बातम्या : 


छपाक' विरोधात हायकोर्टात याचिका निव्वळ पैसे उकळण्यासाठी, मेघना गुलझार यांचा हायकोर्टात आरोप


#JNU Attack : अभिनेत्री दीपिका पादुकोण जखमी विद्यार्थ्यांच्या भेटीला; विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आईशा घोषची घेतली भेट


#JNU Attack जेएनयूमध्ये शांतपणे कन्हैय्या कुमारचं भाषण आणि आझादीच्या घोषणा ऐकत होती दीपिका पादुकोण; पाहा फोटो