Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरने तेलंगणाला पळून जायला वापरलेली कार पोलिसांच्या ताब्यात, गाडीचा मालक धीरज चौधरी म्हणाला, मी मित्राला कार...
Dheeraj Chaudhari on Prashant Koratkar: कोरटकरला चंद्रपूरहून तेलंगणाकडे जाण्यासाठी धीरज चौधरी नामक व्यक्तीने मदत केल्याचा आरोप असून त्याची ही गाडी कोल्हापूर पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे. कार जप्त केल्यानंतर त्याने याबाबत खुलासा देखील केला आहे.

पुणे: महापुरुषांबद्दल अवमानकारक शब्द वापरुन इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ करून धमकी देणारा प्रशांत कोरटकर सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिस कोठडीमध्ये प्रशांत कोरटकरची पोलिस कसून चौकशी केली जात आहे. प्रशांत कोरटकर (Prashant Koratkar) याचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर तो फरार झाला होता. पोलिसांना कसून शोध घेतल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं. दरम्यान कोरटकरला फरार होण्यासाठी ज्यांनी मदत केली, त्यांचा देखील आता तपास पोलिसांनी सुरू केला आहे. फरार होण्यासाठी प्रशांत कोरटकरने जी चारचाकी कार वापरली होती, ती कार आता कोल्हापूर पोलिसांनी चंद्रपूरहून ताब्यात घेऊन कोल्हापुरात आणली आहे. कोरटकरला चंद्रपूरहून तेलंगणाकडे जाण्यासाठी धीरज चौधरी नामक व्यक्तीने मदत केल्याचा आरोप असून त्याची ही गाडी कोल्हापूर पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे. कार जप्त केल्यानंतर त्याने याबाबत खुलासा देखील केला आहे.
प्रशांत कोरटकरला तो फरार असताना धीरज चौधरी नामक व्यक्तीने गाडी दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर अधिक तपासासाठी कोल्हापूर पोलिसांनी चंद्रपूरहून महिंद्रा एक्सयूव्ही कार काल (शुक्रवारी) जप्त करून कोल्हापुरात आणली आहे. पोलीस मुख्यालयात ही गाडी लावण्यात आली होती. मात्र, आता ही गाडी सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस मुख्यालयातून गाडी अज्ञात स्थळी हलवण्यात आली आहे.
कोल्हापूर पोलीस प्रशांत कोरटकरच्या शोधत असताना फरार काळात त्याला बुकीमालक धीरज चौधरी, प्रशिक पडवेकर, हिफायत अली, राजेंद्र जोशी, साईराज पेटकर यांनी मदत केली असल्याचं कोरटकरने चौकशी दरम्यान पोलिसांना सांगितल्याचं न्यायालयात काल (शुक्रवारी) सांगण्यात आलं. यामुळे पुढील तपासासाठी कोरटकरला आणखी दोन दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. फरार काळात कोरटकरने कोणतेही डिजिटल ट्रांझॅक्शन केलेले नव्हते, फोन वापरला नाही, यामुळे त्याला कोणी कोणी मदत केली, या संदर्भातील पोलीस तपास करत आहेत.
कोरटकर मदतीच्या आरोपांवर धीरज चौधरीचा खुलासा
फरार प्रशांत कोरटकरला मदत केल्याच्या आरोपांवर बोलताना धीरज चौधरी म्हणाला, मी प्रशांत कोरटकरला ओळखत नाही, प्रशिक पडवेकर माझा मित्र असल्यामुळे मी त्याला माझी गाडी दिली, मी चंद्रपूरला काही कामासाठी आलोय आणि माझी गाडी खराब झाली आहे, असा प्रशिक पडवेकरचा फोन आला आणि त्यांनी कामासाठी मला गाडी मागितली. मित्र असल्यामुळे मी त्याला गाडी दिली. मी प्रशांत कोरटकरला कुठलीही मदत केलेली नाही, मला कोरटकरबाबत कुठलीही माहिती नव्हती, मी फक्त मित्र या नात्याने प्रशिक पडवेकरची मदत केली. मी चंद्रपूर आणि कोल्हापूर पोलिसांना याबाबत सगळी माहिती दिली आहे आणि त्यांच्याच परवानगीने मी अमरावतीला गेलो होतो. मला कोल्हापूर पोलिसांनी नोटीस दिलेला आहे आणि मी कोल्हापूरला जाऊन आणि मी लवकरच कोल्हापूरला जाऊन माझा जबाब नोंदवणार आहे.























