Chandrapur News: ‘आमदार आपल्या गावी मुक्कामाला’, चिमूरचे आमदार बंटी भांगडिया यांचा स्तुत्य उपक्रम
Chandrapur News: आमदार बंटी भांगडिया यांच्या या अनोख्या मोहिमेला 1 एप्रिलपासून सुरुवात झाली आहे.
चंद्रपूर: जनतेतून निवडून आलेला लोकप्रतिनिधी मग आमदार असो किंवा खासदार असो किंवा अगदी नगरसेवकही, एकदा निवडून आले की, परत मतदारापर्यंत जात नाही. कोणतेही काम असेल तर लोकप्रतिनिधींच्या कार्यालयांच्या चकरा माराव्या लागतात. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandrapur News) चिमूर मतदारसंघाचे आमदार बंटी भांगडिया यांनी मतदारांसोबत संपर्क साधण्यासाठी एका अभिनव उपक्रमाची सुरुवात केली आहे.
"आमदार आपल्या गावी"ते ही थेट "मुक्कामाला" ही अभिनव संकल्पना चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर मतदारसंघाचे आमदार बंटी भांगडीया (Bunty Bhangdiya) यांची आहे. आमदार बंटी भांगडिया यांच्या या अनोख्या मोहिमेला 1 एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. संध्याकाळ होताच आमदार भांगडीया आपली बॅग घेऊन थेट एखाद्या गावात दाखल होतात. याच मोहिमेअंतर्गत ते ताडोबाच्या बफर क्षेत्रात असलेल्या सातारा गावात मुक्कामाला होते. त्यांनी काही विकास कामांचं उदघाटन-लोकार्पण केलं आणि गावातील मुख्य चौकात लोकांशी संपर्क साधायला त्यांनी सुरुवात केली.
नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्यावर आमदारांनी गावकऱ्यांसोबत जेवणाचा आनंद घेतला. सिनेमा पाहिला आणि त्यानंतर पुन्हा एकदा गावातील लोकांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. विशेष म्हणजे गावकऱ्यांना मोठमोठ्या प्रकल्पांच्या आणि विकासकामांच्या अपेक्षा नसून सरकारी कार्यालयात त्यांची छोटी-छोटी कामं होत नाही याचाच जास्त त्रास होत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
आपली गाऱ्हाणी, समस्या मांडण्यासाठी अनेकदा मतदारांना आमदारांच्या घरी किंवा कार्यालयात जावं लागतं. मात्र एखाद्या गावचा आमदारच त्यांच्या गावात येऊन मुक्काम करत असेल आणि त्यांच्या समस्या ऐकणार असेल तर गावकऱ्यांनी देखील त्याचे कौतुक वाटते. चिमूर मतदारसंघात छोटी-मोठी 375 गावं आहेत. त्यातील 50 गावं पहिल्या टप्प्यात आमदारांनी मुक्कामासाठी निवडली आहेत. साहजिकच यातून पुढील विधानसभेसाठी साखर पेरणी होणार यात शंकाच नाही. मात्र अशा प्रकारे गावात मुक्काम केल्याने एखाद्या आमदाराला गावकऱ्यांच्या समस्या जवळून समजतील.
या उपक्रमातून लोकांची कामं अवघ्या काही मिनिटात होत असल्याने समाधान मिळत असल्याच्या भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत. ग्रामीण भागातील, तसेच म्हाताऱ्या,अशिक्षित लोकांना कोणत्याही कामासाठी तहसीलच्या ठिकाणी गेल्यावर सरकारी बाबूच्या कामचुकारपणामुळे नाहक त्रास व पैशाचाही भुर्दंड सोसावा लागतो. पण यामुळे अनेक महिन्यापासून रखडलेली अनेकांची कामे मार्गी लागल्याचे खुद्द ग्रामस्थ सांगतात.
इतर महत्त्वाच्या बातम्या :