Airbag : अपघातावेळी एअरबॅग उघडली नाही तर कार कंपन्यांना दंड द्यावा लागेल, सुप्रीम कोर्टाचे निर्देश
Airbags Safety Feature: अपघाताप्रसंगी गाडीतील एअर बॅग्स उघडल्या नाहीत आणि चालकाला किंवा त्यातील लोकांना दुखापत झाली, तर ग्राहकाला झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून सदर कार कंपनीला दंड ठोठावण्यात येणार आहे.
![Airbag : अपघातावेळी एअरबॅग उघडली नाही तर कार कंपन्यांना दंड द्यावा लागेल, सुप्रीम कोर्टाचे निर्देश Car companies will have to pay fines if airbags are not opened during accidents, Supreme Court’s decision Airbag : अपघातावेळी एअरबॅग उघडली नाही तर कार कंपन्यांना दंड द्यावा लागेल, सुप्रीम कोर्टाचे निर्देश](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/10/db59c8a2cfddde9ebcd6f12bc98c0c7c_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Airbags Safety Feature: आपण जेव्हा नवी कार खरेदी करतो, तेव्हा त्यातील सेफ्टी फीचर्सची व्यवस्थित तपासणी करतो. सुरक्षेच्या दृष्टीने परिपूर्ण असणारी कारच आपण खरेदी करतो. गाडीमधील सर्वात महत्त्वाचे सेफ्टी फीचर म्हणजे ‘एअर बॅग्स’. अपघाताच्या वेळी गाडीतील या एअर बॅग्स महत्त्वपूर्ण भूमिका बाजावतात. अपघातजन्य स्थिती येताच या एअर बॅग्स उघडतात आणि गाडीतील चालक व प्रवाशांचा जीव वाचतो. मात्र, सध्या काही अपघातांच्या प्रकरणात असे लक्षात आले आहे की, ऐन प्रसंगी या एअर बॅग्स उघडल्याच नाहीत. यामुळेच गाडीत असेलल्या लोकांच्या जीविताला धोका निर्माण झाला.
मात्र, आता अपघाताप्रसंगी गाडीतील एअर बॅग्स उघडल्या नाहीत आणि चालकाला किंवा त्यातील लोकांना दुखापत झाली, तर ग्राहकाला झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून सदर कार कंपनीला दंड ठोठावण्यात येणार आहे.
सुप्रीम कोर्टाचे निर्देश
गुरुवारी अशाच एका प्रकरणावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने म्हटले की, जर अपघाताच्या प्रसंगी गाडीतील एअर बॅग्स उघडल्या नाहीत, तर कार कंपनीला दंड द्यावा लागणार आहे. गाडीतील एअर बॅग्स न उघडणे याला कार कंपनीची चूक मानले जाईल. तसेच, दंड आकारल्याने कार कंपन्यांमध्ये ग्राहकाच्या सुरक्षेच्या दृष्टीने जागरूकता वाढेल आणि ते याची अधिक काळजी घेतील. न्यायमूर्ती विनीत सरन आणि अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठाने ही सुनावणी केली आहे.
काय होतं नेमकं प्रकरण?
2015मध्ये शैलेंद्र भटनागर नामक एका व्यक्तीने ह्युंडाई मोटर इंडिया लिमिटेडची क्रेटा ही कार खरेदी केली होती. 2017मध्ये या गाडीचा अपघात झाला, तेव्हा गाडीतल एअर बॅग्स उघडल्याच नाहीत. यामुळे अपघातात ग्राहकाला गंभीर दुखापत झाली. या अपघातानंतर शैलेंद्र यांनी ग्राहक मंचाकडे या कार कंपनीविरोधात याचिका दाखल केली. यात म्हटले की, या कारचे सेफ्टी फीचर्स लक्षात घेऊन आम्ही ही कार खरेदी केली होती. पण, अपघाताच्या वेळी यातील सेफ्टी फीचर्स कमी आले नाहीत आणि गंभीर दुखापत झाली. या प्रकरणात ग्राहक मंचाने ग्राहकाच्या बाजूने निर्णय दिला. त्यांच्या या निर्णयावर ह्युंडाईने सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले. मात्र, सुप्रीम कोर्टाने देखील कर कंपनीची ही याचिका फेटाळून लावत, ग्राहकाला कार बदलून देण्यास, तसेच नुकसान भरपाई म्हणून 3 लाख रुपये देण्यास सांगितले. चालक आणि प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन केंद्र सरकारने 1 जानेवारी 2022पासून प्रत्येक कारमध्ये एअर बॅग्स अनिवार्य केल्या आहेत. यामुळे ग्राहकाला अधिक सुरक्षा मिळू शकते.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)