(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sadabhu Khot : देशात 80 कोटी जनता ऐतखाऊ, रेशन व्यवस्था बंद करा; सदाभाऊ खोत यांची वादग्रस्त मागणी
Sadabhau Khot : देशातील 80 कोटी लोक ऐतखाऊ असून बलशाली भारत करण्यासाठी रेशन व्यवस्था बंद करा अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
बुलढाणा : देशातील 80 कोटी जनता ह ऐतखाऊ आहे. त्यामुळे आता देशातील रेशन व्यवस्था कायमची बंद करून देशाला बलशाली करा अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केली आहे. बुलढाणामध्ये रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सदाभाऊ खोत आले होते. त्यावेळी त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. राज्यासह देशातील कोट्यवधी कुटुंबांना रेशनिंग व्यवस्थेचा मोठा आधार आहे. अनेक अर्थतज्ज्ञांकडून सार्वजनिक वितरण प्रणाली मजबूत करण्याची मागणी केली जात असताना भाजप महायुतीमधील (BJP -Mahayuti) सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सदाभाऊ खोत यांनी थेट भाजपच्या प्रमुख मुद्याला विरोध कसा केला, याची चर्चा सुरू झाली आहे.
सदाभाऊ खोत म्हणाले की, शेतीवरचा फक्त 40 टक्के समाज उरला असून देशात 80 कोटी माणसं आयत खात आहेत. त्यामुळे देशातील रेशन व्यवस्था बंद करून देश बलशाली बनवावा अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली. बुलढाणा जिल्ह्यातील रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला सदाभाऊ खोत भेट देण्यासाठी आले होते. आपल्या देशातील ऐतखाऊ लोकांची संख्या वाढली असून देशातील 80 कोटी माणसं आयतं खात आहेत. जर इतकी माणसं आहेत खात असतील तर हा देश भिकाऱ्यांचा आहे. माणसं भिकारी बनवण्याचे काम सुरू आहे अशीही टीका सदाभाऊ खोत यांनी केली.
सदाभाऊ खोत यांनी म्हटले की, माणसाला ज्यावेळेस सगळं फुकट मिळतं समजा त्या सगळ्या अफूच्या गोळ्या आहेत. राजकीय पक्षांची चढाओढ लागली आहे हे फुकट ते फुकट त्यामुळे देश भिकाऱ्यांचा बनत चालला आहे. प्रत्येकाने श्रम करावे श्रमावरच देश बलशाली होईल असेही सदाभाऊ खोत म्हणाले.
भाजपकडून मोफत रेशनचा मोठा मुद्दा
केंद्र सरकारने कोविड काळात 80 कोटी लोकांना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतंर्गत ( Pradhan Mantri Garib Kalyan Ann Yojana- PMGKAY) लाभार्थ्यांना 5 किलो अन्नधान्य अगदी मोफत मिळते. या अंतर्गत बीपीएल कार्ड असलेल्या कुटुंबांना दर महिन्याला 4 किलो गहू आणि 1 किलो तांदूळ मोफत दिले जाते. ही योजना आणखी पाच वर्ष सुरू राहणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी काही दिवसांपूर्वी एका सभेत केली होती. भाजपकडून या घोषणेचा मुद्दा मोठा केला होता. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) ही मोदी सरकारच्या सर्वात यशस्वी योजनांमध्ये गणली जाते. कोरोना महामारीच्या तीन लाटांमध्ये या योजनेने मोठे काम केले.