Buldhana Name Change : सिंदखेडराजा शहराचं नाव कायम ठेवा, बुलढाण्याचं नाव "जिजाऊ नगर" करा; सर्वपक्षीयांची मागणी, मुख्यमंत्र्यांना निवेदन
Buldhana Name Change : सिंदखेडराजा शहाराचं नामांतर न करता संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचं 'जिजाऊ नगर' असं नामांतर करण्याची मागणी आता जोर धरु लागली.
Buldhana Name Change : राजमाता जिजाऊ (Rajmata Jijau) यांचं जन्मस्थान असलेल्या बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील सिंदखेडराजा (Sindkhed Raja) शहाराचं नामांतर न करता संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचं 'जिजाऊ नगर' (Jijau Nagar) असं नामांतर करण्याची मागणी आता जोर धरु लागली. याबाबत जिल्ह्यातील सर्वपक्षीयांनी तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना एक निवेदन पाठवलं आहे.
'सिंदखेडराजाचं नाव कायम ठेवा, बुलढाणा जिल्ह्याचं नाव बदला'
श्रीमंत लखुजीराव राजे जाधव यांचं राजधानीचे ठिकाण असलेलं सिंदखेड राजा या ऐतिहासिक शहराचे नाव "जिजाऊ नगर" करण्यात यावं, या प्रस्तावाला सिंदखेडराजा शहरातील आणि जिल्ह्यातील नागरिकांचा तसंच राजे लखुजीराव जाधव यांच्या वंशजांचा आक्षेप आहे, विरोध आहे. यासाठी सिंदखेडराजा इथल्या लखुजीराव राजे जाधव यांच्या राजवाड्यापासून तहसील कार्यालयापर्यंत सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी रॅली काढली होती. सिंदखेडराजा हे नाव कायम ठेवून बुलढाणा जिल्ह्याला जिजाऊ नगर हे नाव देण्यात यावे अशा स्वरुपाचं निवेदन तहसीलदारांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आले.
निवेदनात काय म्हटलं आहे?
निवेदनात म्हटलं आहे की, "राजे लखुजीराव जाधव यांच्यामुळेच सिंदखेडराजा हे नाव पडले. याचे अनेक पुरावे सिंदखेडराजा इथे पाहायला मिळतात. त्यांच्या काळामध्येच किनगाव राजा, देवुळगाव राजा, मेहुना राजा, आडगाव राजा या गावांना सुद्धा जाधवांची पार्श्वभूमी लाभलेली आहे. ही सर्व गावे जाधवकालीन आहे. इतिहासामध्ये तसा पुरावा सुद्धा पाहायला मिळतो. सिंदखेडराजा हे सत्तेचे मुख्य केंद्र होते. इथून राजे लखुजीराव जाधव राज्यकारभार पाहत होते. या शहराला ऐतिहासिक आणि आध्यात्मिक फार मोठा वारसा लाभला आहे. राजमाता जिजाऊ या राजे लखुजीराव जाधव यांची मुलगी आहेत. जिजाऊंचे वडील राजे लखुजीराव जाधव यांच्या कार्यकर्तृत्वाच्या, इतिहासाच्या पाऊल खुणा आजही सिंदखेडराजा येथे पाहायला मिळतात म्हणून सिंदखेडराजा हे नाव कायम राहणे गरजेचे आहे. त्याऐवजी बुलढाणा जिल्ह्याला जिजाऊ नगर हे नाव देण्यात यावे.
औरंगाबाद, उस्मानाबादचं नामांतर
उत्तर प्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांनी अनेक जिल्ह्यांची नावं बदलली. त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील अनेक जिल्ह्यांची नावं बदलली. महाराष्ट्र सरकारने औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर केले, उस्मानाबादचे धाराशिव केले. त्याच धर्तीवर बुलढाणा जिल्ह्याचे नाव जिजाऊ नगर करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा
नामांतरावरुन राजकारण तापलं; आजपासून खासदार इम्तियाज जलील बेमुदत उपोषणावर