Ravikant Tupkar : गुरुच्या पावलावर शिष्याचे पाऊल, लोकसभा निवडणुकीसाठी रविकांत तुपकर वापरणार शेट्टींचे 'हे' तंत्र!
Ravikant Tupkar : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी दिलेल्या वर्गणीतून निवडणूक लढवून संसद गाठली होती. अगदी त्याच धर्तीवर आता शेतकरी नेते रविकांत तुपकर हे बुलढाणा लोकसभा निवडणूक लढणार आहेत.
Ravikant Tupkar : शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून (Buldhana Lok Sabha) निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे यापूर्वीही शेतकरी नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी लोकसभा निवडणूक लढवून संसदेत पाऊल ठेवलं होतं त्या तंत्राचा वापर करत आता रविकांत तुपकरी संसदेत जाणार का? यावर चर्चा सुरू झाली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी दिलेल्या वर्गणीतून निवडणूक लढवून संसद गाठली होती. अगदी त्याच धर्तीवर आता शेतकरी नेते रविकांत तुपकर हे बुलढाणा लोकसभा निवडणूक लढणार आहेत. रविकांत तुपकर यांनी जाहीर केल्यानुसार 'एक व्होट, एक नोट' ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे. यानुसार, कार्यकर्ते, सामान्य लोकांकडून वर्गणी जमा करून रविकांत तुपकर लोकसभेच्या निवडणुकीत उतरणार आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी ज्याप्रमाणे कार्यकर्त्यांकडून वर्गणी करून लोकसभा निवडणूक लढवली होती त्याचीच कॉपी करून आता रविकांत तुपकर हे लोकसभा निवडणूक लढण्याच्या बेतात असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
राजू शेट्टी यांचा हात धरून रविकांत तुपकर हे शेतकरी आंदोलनात आले. मागील 20 वर्षांपासून तुपकर हे राजू शेट्टींसोबत आहेत. अगदी रस्त्यावरच्या आंदोलनापासून तर थेट मंत्रालयावर मोर्चा काढणे आदी आंदोलने-मोर्चे त्यांनी केली. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे मूळ हे दिल्लीत असल्याने त्यांनी आता लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय तुपकर यांनी घेतला आहे.
तुपकरांनी लोक वर्गणीतून लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय जरी घेतला असला तरी मात्र आपले गुरु असलेले राजू शेट्टी यांच्याच पावलावर पाऊल ठेवत व त्यांच्याच निवडणूक तंत्राचा वापर करत रविकांत तुपकर हे निवडणूक लढवणार आहेत आगामी काळात त्यांना कसं यश मिळतं हे बघणे महत्त्वाचे असेल.
तुपकरांकडून आंदोलन
मागील काही महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या विविध मुद्यांवर रविकांत तुपकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावरही तुपकर यांनी मोर्चा काढला होता. त्यावेळी तुपकरांनी समृद्धी मार्गावरून वाहनांच्या ताफ्यासह नागपुरात प्रवेश केला होता.
शेट्टी आणि तुपकरांमध्ये मतभेद?
स्वाभिमानी शेतकरी संघटनेत राजू शेट्टी आणि रविकांत तुपकरांमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. काही महिन्यांपूर्वी रविकांत तुपकर यांच्या एल्गार रथयात्रा वा मोर्चात कुठेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा फलक वा राजू शेट्टी यांचा उल्लेख नव्हता. त्यामुळे दोघांमध्ये मतभेद झाल्याच्या चर्चांना उधाण आले होते. तुपकर हे भाजपात प्रवेश करणार असल्याचेही म्हटले जात होते.