Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यात वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या, आजारपणासह नापिकी आणि बँकेच्या कर्जाला कंटाळून संपवलं जीवन
बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात एका वृद्ध दामप्त्यानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.
Farmer Suicide News : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात एका वृद्ध दामप्त्यानं आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बँकेचं कर्ज, नापिकी आणि आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील बेलुरा गावात घडली आहे. वसंत डामरे (70) आणि सरलाबाई डामरे (65) असं आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचं नाव आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात सातत्यानं शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याचं चित्र दिसत आहे. शेतकऱ्यांना सातत्यानं विविध संकटाचा सामना करावा लागतो. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकट येतात. या संकटांचा सामना करताना शेतकरी नैराश्येत जाऊन आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत असल्याचे दिसत आहे. नैसर्गिक संकटामुळं पीकं वाया जातात. त्यामुळं बँकांचे घेतलेलं कर्ज फेडायेच कसे असा प्रश्न निर्माण होतो. दिवसेंदिवस शेतकऱ्यांवर बँकांचा कर्जाचा बोजा वाढत जातो. त्यामुळं शेतकरी आत्महत्येसारखं पाऊल उचलत आहेत. असाच प्रकार बुलढाणा जिल्ह्यात घडल्यानं खळबळ उडाली आहे.
Farmers suicide : शेतकरी आत्महत्या वाढल्या
राज्यात विविध संकटांमुळं शेतकरी आत्महत्या करत आहेत. मराठवाडा आमि विदर्भात आत्महत्येचं प्रमाण जास्त आहे.
महाराष्ट्रात नऊ महिन्यांत म्हणजेच जानेवारी 2022 ते सप्टेंबर 2022 मध्ये 2 हजार 138 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये सर्वात जास्त आत्महत्या या विदर्भात झाल्या आहेत. तसेच मराठवाडा, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील आत्महत्यांचा आकडा वाढत आहे. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. सप्टेंबरनंतर देखील राज्यात अनेक ठिकाणी शेतकरी आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत.
Heavy Rain : अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
यावर्षी राज्यात पावसानं कहरच केला होता. सुरुवातील जून महिन्यात पावसानं दडी मारली होती. मात्र, नंतरच्या काळात म्हणजे जुलै महिन्याच्या शेवटी आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी राज्यात धुमाकूळ घातला होता. या पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. शेतकऱ्यांची उभी पीक वाया गेल्यानं शेतकरी संकटात सापडला होता. सोयाबीन, कापूस, तूर, फळबागांना या पावसाचा मोठा फटका बसला होता. तसेच यावर्षी परतीचा पाऊस लांबल्याचा फटकाही शेतकऱ्यांना बसला. अतिवृष्टीतून वाचलेली उरली सुरली पीक या परतीच्या पावसानं वाया गेली.
या पावसाचा मराठवाडा आणि विदर्भाला मोठा फटका बसला होता. अशातच सध्या शेतकऱ्यांकडे असलेल्या पिकांनाही योग्य दर मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: