"उधार मागू नका, कर्ज काढून व्यवसाय सुरु केला," मलकापुरातील फलक; कोरोनानंतर छोट्या व्यावसायिकांचं भीषण वास्तव
Buldhana News : बुलढाण्यातील भाजी विक्रेत्याने लावलेल्या फलकातून कोरोनानंतर छोट्या व्यावसायिकांचं भीषण वास्तव समोर येत आहे. "उधारी मागूच नका. व्याजाने पैसे आणून व्यवसाय सुरु केला आहे. नगदी पैसे द्या.. भीक मागायची वेळ आली आहे!" असं फलक त्याने लागलं आहे.
Buldhana News : दोन वर्षांपासून कोरोना संकटाने जगाला हादरुन सोडलं. यामध्ये सर्वसामान्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान देखील झालं. छोट्या-मोठ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ सुद्धा आली होती. मात्र आता कोरोना संकट नियंत्रणात आल्यावर बुडालेला छोटा व्यवसाय सुरु करण्यासाठी व्यावसायिकांना काय काय उपाययोजना कराव्या लागत आहे, हे समोर आलं आहे.
कोरोना नियंत्रित झाल्यावर अनेकांनी संकटातून उभं राहण्यासाठी आता कुणी उसनवारी करुन तर कुणी व्याजाने पैसे घेऊन व्यवसाय सुरु केला. मात्र प्रचलित पद्धतीनुसार उधारीमुळे पुन्हा आपल्यावर आर्थिक संकट येऊ नये म्हणून व्यावसायिक अनेक फंडे वापरताना दिसत आहे. बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील मलकापूर शहरातील एका भाजी विक्रेत्याने आपल्या थाटलेल्या दुकानावर लावलेला एक बोर्ड सर्वांना अचंबित करत आहे. या बॉर्डरवर त्याने "उधारी पूर्ण बंद केली आहे. उधारी मागूच नका. व्याजाने पैसे आणून व्यवसाय सुरु केला आहे. नगदी पैसे द्या.. भीक मागायची वेळ आली आहे!" असे बॅनर लावून गल्लोगल्ली जाऊन आपला व्यवसाय सुरु केला. त्याच्या या बोर्डाचा फोटो आणि व्हिडीओ समाजमाध्यमात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
कोरोना (Coronavirus) काळात सगळं बंद होतं. छोटे व्यावसायिक हवालदिल झाले, आर्थिक संकट आलं. पण कोरोना नियंत्रणात आल्यावर या सर्वांना धीर देण्याची, या संकटातून सर्वांना बाहेर काढण्याची जबाबदारी ज्या नेत्यांची, राजकारण्यांची होती ते मात्र राजकारणात, आरोप-प्रत्यारोपात व्यस्त आहेत. मात्र अजूनही कोरोना संकटातून छोटे व्यावसायिक सावरलेले नाहीत हे भीषण वास्तव राज्यकर्त्यांनी जाणून घेणे ही गरजेचं आहे.
हे हास्यास्पद असले तरी खरोखर ही वस्तुस्थिती आहे. कारण कोरोना काळात सर्व सामान्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली होती. यामध्ये नुकसान सर्वांचेच झाले असले तरी गरीब गरजू हवालदिल झाला होता. परंतु तब्बल दोन वर्षांनी नागरिकांच्या सहकार्याने कोरोना संकट आटोक्यात आलं आणि सर्व व्यवसाय सुरु झाले. जरी बाजापेठेत व्यवसायाची मंदी असली तरी सर्वसामान्य छोटा-मोठा व्यवसाय करुन पोटाची खळगी भागवत आहे. मात्र आता व्यावसाय सुद्धा मंदावले आहेत. मात्र आता व्यावसायिक सुद्धा बोर्ड लावून उधारी बंद केली आहे. उधारी मागू नका. नगदी पैसे द्या. भीक मागायची वेळ आली आहे, असे आवाहन करुन ग्राहकांना सतर्क करत आहेत.