(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पश्चिम विदर्भात आफ्रिकन स्वाईन फ्लूमुळे शेकडो डुकरांचा मृत्यू; डुकरांचा बंदोबस्त करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Buldhana News: बुलढाणा शहरात गेल्या महिन्याभरापासून शेकडो डुकरांचा अचानक मृत्यू होत आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
Maharashtra Buldhana News: गेल्या काही आठवड्यांपासून पश्चिम विदर्भात (West Vidarbha) काही जिल्ह्यात अज्ञात आजारानं शेकडो डुकरं मृत्युमुखी पडत असल्याचं समोर आलं होतं. मात्र आता ही डुकरं आफ्रिकन स्वाईन फ्लूनं (African Swine Flu) मृत्युमुखी पडत असल्याचं समोर आलं आहे. प्रशासनानं या डुकरांचा नायनाट करण्याचे आदेश दिले आहेत.
बुलढाणा (Buldhana News) शहरात गेल्या महिन्याभरापासून शेकडो डुकरांचा अचानक मृत्यू होत आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. याबाबतीत संशय आल्यानं नगरपालिकेच्या वतीनं मृत्यू झालेल्या डुकरांच्या अवयवाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते आणि त्यानंतर या सर्व डुकरांचा मृत्यू हा 'आफ्रिकन स्वाईन फ्लू'मुळे झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा संसर्ग रोखण्यासाठी शहरातील सर्व डुकरांचा नायनाट करण्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिले आहेत. नगरपालिकेनं आता या डुकरांचा नायनाट करण्यासाठी दहा जणांचं पथक तयार केलं आहे. आता शहरातील डुकरांचा नायनाट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या आफ्रिकन स्वाईन फ्लूपासून मानवी आरोग्याला कुठलाही धोका नसून नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही, असं आवाहन देखील नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी केलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती जिल्ह्यात शहरातील आणि ग्रामीण भागांत डुकरं अचानक मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण वाढलं होतं. यानुसार परिसरात नागरिकांमध्ये भीतीही निर्माण झाली होती. मात्र आफ्रिकन स्वाईन फ्ल्यूचा प्रसार हा फक्त डुकरं आणि तत्सम प्राण्यांमध्ये होतो आणि मानवी आरोग्याला सध्या तरी त्याचा धोका नसल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांत पश्चिम विदर्भातील कोणत्या जिल्ह्यात किती डुकरं मृत्यूमुखी पडली आहेत, त्यांची आकडेवारी जाणून घेऊयात...
पश्चिम विदर्भातील कोणत्या जिल्ह्यात किती डुकरांचा मृत्यू?
- बुलढाणा शहरात सर्वात जास्त म्हणजे, जवळपास एक हजारावर डुकरं आफ्रिकन स्वाईन फ्लूनं दगावलीत
- अकोला जिल्ह्यातही 20 डुकरांचा मृत्यू स्वाईन फ्लूमुळे, तर काही डुकरांचा अहवाल अद्याप प्रलंबित
- वाशिम जिल्ह्यात डुकरांना स्वाईन फ्ल्यूची लागण झालीय, मात्र अद्याप मृत्यूबद्दल माहिती नाही
- अशीच काहीशी परिस्थिती अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातही आहे.
दरम्यान, सध्या पावसाळा सुरू असल्यानं संसर्गजन्य अजारांच प्रमाण वाढलं आहे. मात्र आता डुकरांवरील आफ्रिकन स्वाईन फ्ल्यूमुळे पशूसंवर्धन अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे. आधीपासूनच राज्यभरात जनावरांमध्ये लम्पी आजारानं थैमान घातलं होतं. त्यापूर्वी बर्डफ्लूनंही डोकं वर काढलं होतं. अशातच आता पश्चिम विदर्भात आफ्रिकन स्वाईन फ्लूमुळे मोठ्या प्रमाणात डुकरांचा मृत्यू झाल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे प्रशासनासमोर मोठं आव्हान असून चिंतेतही भर पडली आहे.