Buldhana News : अल्पभूधारक शेतकऱ्याने केला कन्येचा शाही विवाह; लग्नात पशुपक्षांसह मुंग्यांनाही पंगत, पाच गावातील दहा हजार नागरिकांना जेवणावळी
Buldhana News : बुलढाण्यातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने आपल्या कन्येचा शाही विवाह केला. या विवाहात परिसरात असणाऱ्या पशुपक्षांनाही पंगत देण्यात आली होती. इतकंच नाही तर पाच गावातील दहा हजार लोकांना लग्नासाठी आणि जेवणासाठी निमंत्रणही देण्यात आलं होतं.
Buldhana News : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील कोथळी या छोट्याशा गावातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने आपल्या कन्येचा शाही विवाह (Royal Wedding) केला. या विवाहाची खासियत ही आहे की, या विवाहात परिसरात असणाऱ्या पशुपक्षांनाही पंगत देण्यात आली होती. इतकंच काय तर परिसरातील पाच गावातील दहा हजार लोकांना लग्नासाठी आणि जेवणासाठी निमंत्रणही देण्यात आलं होतं.
पाच गावातील दहा हजार लोकांना लग्नाचं आणि जेवणाचं निमंत्रण
कोथळी गावातील प्रकाश सरोदे या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या एकुलत्या एक कन्येचा विवाह सोहळा पार पडला. यात नवल काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण मंडळी या विवाह सोहळ्यासाठी गावालगत पाच एकर शेतात मंडप बांधण्यात आला होता. गावाजवळील पाच गावातील सर्वांना या विवाहाचं निमंत्रण देण्यात आलं आणि जवळपास दहा हजार लोकांना जेवणही. इतकंच काय तर सरोदे यांनी परिसरातील गुरे, पशू पक्ष्यांनाही पंगत दिली. यासाठी गायींना दहा क्विंटल ढेप, गुरांना दहा ट्रॉली सुका चारा, परिसरातील श्वानाना पंगत इतकंच काय तर परिसरातील मुंग्या ही उपाशी राहू नये म्हणून मुंग्यांना दोन पोते साखर टाकण्यात आली. या शाही विवाह सोहळ्यात कुणीही उपाशी राहू नये म्हणून काळजी घेण्यात आली.
पक्षांना तांदूळ, श्वानांना जेवण, मुंग्यांना साखर; विवाहात मुक्या प्राण्यांची काळजी
प्रकाश सरोदे यांनी आपल्या लाडक्या कन्येचा म्हणजेच पूजाचा विवाह भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या अतुल दिवाणे याच्याशी केला. अल्पभूधारक असूनही नातेवाईकांच्या मदतीने हा विवाह सोहळा म्हणजे परिसरातील सर्वांसाठी नेत्रदीपक ठरला. विवाहात खरंतर मुक्या प्राण्यांचीही काळजी घेण्यात आली. सर्वप्रथम गायीला पूजन करुन परिसरात असणाऱ्या सर्व गायींना ढेप खाऊ घालण्यात आली. त्यानंतर इतर सर्वांच्या गुरांना चारा, परिसरातील पक्षांना तांदूळ, श्वानांना जेवण देण्यात आलं तर आपल्या कन्येच्या विवाहात मुंग्यांही उपाशी राहू नये म्हणून दोन क्विंटल साखर परिसरातील मुंग्यांना टाकण्यात आली. शिवाय कोथळी हे छोट्याशा गावा परिसरातील पाच गावातील जवळपास दहा हजार नागरिकांना विवाहाचं आणि जेवणाचं आमंत्रण देण्यात आलं होतं.
अनोख्या शाही विवाहाची जिल्हाभर चर्चा
अल्पभूधारक शेतकरी असूनही आपल्या कन्येचा विवाह भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या युवकासोबत मोठ्या थाटात आणि शाही पद्धतीने केल्याने तसंच विवाहात मुक्या प्राण्यांची ही काळजी घेतल्याने या विवाहाची चर्चा जिल्हाभरात होत आहे.