Union Budget 2024: बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी मोदी सरकारने पेटारा उघडला, दोन्ही राज्यांना छप्परफाड पॅकेज
Union Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पामध्ये चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री असलेल्या आंध्र प्रदेशसाठी 15 हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
Union Budget 2024: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) आज (मंगळवारी) संसदेत मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प आज सादर करत आहेत. मोदी सरकार 3.0 चा अर्थसंकल्प (Union Budget 2024) सादर करत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी सादर केलेला हा सातवा अर्थसंकल्प आहे. यापूर्वी, हे निवडणुकीचे वर्ष असल्याने, 1 फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात कोणतेही महत्त्वपूर्ण धोरणात्मक बदल दिसून आलेले नाहीत. तर या अर्थसंकल्पामध्ये मोदी सरकार आंध्र प्रदेश आणि बिहार राज्यावर मेहरबान झाल्याचं दिसून येत आहे. देशभरात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला अपेक्षित यश न मिळाल्याने त्यांना आंध्र प्रदेशातील आणि बिहारमधील पक्षाचा पाठींबा घ्यावा लागला. त्यानंतर एनडीएचे सरकार अस्तित्त्वात आले आणि देशात सत्ता स्थापन झाली त्याचा प्रभाव आता अर्थसंकल्पात देखील दिसून आला आहे.
आजचा अर्थसंकल्प मांडत असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री असलेल्या आंध्र प्रदेशसाठी 15 हजार कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. तर नितीश कुमार मुख्यमंत्री असलेल्या बिहारसाठी 26 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी अर्थमंत्र्यांनी दोन्ही राज्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.
बिहारमध्ये बनवणार रस्त्यांचे जाळे, बजेटमध्ये 26 हजार कोटींची तरतूद
केंद्र सरकारने 2024 च्या अर्थसंकल्पात बिहारला (Bihar) मोठी भेट दिली आहे. अर्थमंत्री सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी बिहारला आर्थिक मदत जाहीर केली आहे. बिहारच्या बोधगयामध्ये आम्ही औद्योगिक विकासाला चालना देऊ, असे अर्थमंत्र्यांनी यावेळी सांगितलं आहे. त्यामुळे पूर्व विभागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. रस्ते जोडणी प्रकल्पांच्या विकासातही आम्ही सहकार्य करू. पाटणा-पूर्णिया द्रुतगती मार्ग, बक्सर-भागलपूर महामार्ग, बोधगया-राजगीर-वैशाली-दरभंगा आणि बक्सरमध्ये गंगा नदीवर अतिरिक्त द्विपदरी पूल 26,000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी बिहारमध्ये नवीन विमानतळ, वैद्यकीय सुविधा आणि क्रीडा पायाभूत सुविधांची घोषणा केली. याशिवाय राज्यातील महामार्गांसाठी आणखी 26 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
आंध्र प्रदेशला अर्थसंकल्पात 'मोठी भेट', केंद्र नवीन राजधानीसाठी 15000 कोटी देणार
अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आंध्र प्रदेशच्या नवीन राजधानीसाठी 15,000 कोटी रुपयांची घोषणा केली आहे. टीडीपीकडून अमरावतीला आंध्र प्रदेशची राजधानी बनवायची आणि विकसित करायची आहे, त्यासाठी त्यांना १५ हजार कोटी रुपये देण्यात यावेत, अशी मागणी सातत्याने होत होती. चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील टीडीपी सरकारला केंद्र सरकारने सहमती दर्शवली असून आता अर्थसंकल्पात नवीन भांडवलाच्या बांधकामासाठी निधीची घोषणा केली आहे. अमरावती विजयवाड्याजवळ वसलेले आहे. अमरावतीला सुरवातीपासून तयार केले जात आहे.