Parinay Phuke : 'शिवसेनेचा बाप मीच' म्हणणाऱ्या परिणय फुकेंची दिलगिरी, म्हणाले, भावना दुखावल्या असतील तर...
Parinay Phuke Statement On Shiv Sena Bhandara : आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, मला तसं म्हणायचं नव्हतं असं म्हणत आमदार परिणय फुके यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

भंडारा : 'शिवसेनेचा बाप मीच' असं म्हणणारे भाजपचे आमदार परिणय फुके यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली. मला तसं म्हणायचं नव्हतं, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं फुकेंनी म्हटलंय. तसेच माझ्या वक्तव्यामुळे मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो असं फुके म्हणाले. परिणय फुके यांनी एक निवेदन काढून दिलगिरी व्यक्त केली.
भंडाऱ्यातील सहकार क्षेत्राच्या निवडणुका पार पडल्यानंतर भाजपाच्या कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळाव्यात भाजप आमदार परीणय फुके यांनी शिवसेनेवर टीका केली होती. 'मीच शिवसेनेचा बाप' असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यानंतर शिंदेंची शिवसेना आणि भाजपामध्ये तणाव निर्माण झाल्याचं दिसून आलं.
Parinay Phuke Vs Shivsena : शिवसेना आक्रमक
परिणय फुकेंच्या या वक्तव्यानंतर भंडाऱ्यात शिवसेना आक्रमक झाली आणि आमदार फुके यांनी माफी मागावी, अन्यथा सेना स्टाईलने त्यांना प्रतिउत्तर देऊ असा इशारा दिला. यानंतर आता परीणय फुके यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढलं आहे. त्यात त्यांनी, मला तसं बोलायचं नव्हतं, कुणाला दुखविण्याचा माझा हेतू नव्हता असं म्हणाले.
माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. त्यामुळे आमच्या मित्र पक्षातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावना दुखविल्या असतील तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो असं प्रसिद्धीपत्रक आमदार परीणय फुके यांच्या कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलं.
Parinay Phuke : काय म्हटलंय परिणय फुकेंनी?
भारतीय जनता पार्टीच्या भंडारा येथील मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना मी केलेल्या एका विधानामुळे महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेतील पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा गैरसमज झाला आहे. वास्तविक मला तसे बोलायचे नव्हते. कुणाला दुखविण्याचा माझा हेतू सुद्धा नव्हता. माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे. परंतु माझ्या विधानामुळे आमच्या मित्र पक्षातील शिवसेनेचे पदाधिकारी- कार्यकर्त्यांच्या भावना दुखवल्या असतील तर त्याबद्दल मी मनापासून सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो.
परिणय फुकेंच्या वक्तव्यानंतर शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केली. परिणय फुके यांचे वक्तव्य चुकीचं असल्याचं ते म्हणाले. तर मंत्री संजय शिरसाट यांनी परिणय फुकेंना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं. शिवसेनेचा बाप फक्त बाळासाहेब ठाकरे हेच आहेत असं म्हणत संजय शिरसाट यांनी परिणय फुके यांना इशारा दिला होता.
ही बातमी वाचा:























