Bhandara : रील करताना पाण्यात पडला, बुडताने जिवाचा आकांत केला, पण रीलचा भाग असल्याचं समजून मित्रांनी शूटिंग केलं; भंडाऱ्यात युवकाचा मृत्यू
Bhandara Youth Death : रील करण्यासाठी खड्ड्यातील पाण्यात उतरलेल्या युवकाचा पाण्याचा अंदाज न आल्याने मृत्यू झाला. यावेळी त्याचे मित्र हा प्रकार शूट करण्यात व्यस्त होते.

भंडारा: मोबाईलवर रील बनवण्याच्या नादात एक 17 वर्षाचा तरुण खड्ड्यात पडला आणि त्यामध्ये त्याचा बुडून मृत्यू झाला. भंडाऱ्यात ही धक्कादायक घटना घडली. पाण्यात उतरलेल्या हा तरुण बुडताना जिवाचा आकांत करुन मदत मागत होता. पण हा रीलचा प्रकार असल्याचं समजून त्याचे मित्र शूट करत राहिले आणि त्या तरुणाचा मृत्यू झाला. हा सर्व प्रकार मयत तरुणाच्या मित्रांच्या मोबाईलमध्ये कैद झाला आहे. तीर्थराज बारसागडे असं मृत तरुणाचं नाव आहे.
ही घटना भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील अड्याळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चुल्हाड शेतशिवारात रविवारी सायंकाळी घडली. तीर्थराज बारसागडे हा सोनेगाव येथील असून त्याला रील काढून सोशल मीडियावर टाकण्याची आवड होती. पण त्यामुळेच त्याचा घात झाला.
रील करायला गेला आणि पाण्यात बुडाला
तीर्थराज याला शेतशिवारात असलेल्या एका मोठ्या खड्ड्यातील पाण्यात पोहण्याची रील बनवायची होती. हे संपूर्ण चित्रीकरण करण्यासाठी त्यानं स्वतःचा मोबाईल मित्रांना दिला आणि तो खड्ड्याच्या दुसऱ्या भागात उभा राहिला होता. मात्र, ज्या खोल खड्ड्यात तीर्थराजने पोहण्यासाठी सूर मारला, त्या खड्ड्यांचा अंदाज न आल्यानं खोल पाण्यात तो गटांगड्या खाऊ लागला.
मदत मागितली पण...
आपण बुडतोय असं तो जिवाच्या आकांताने ओरडत होता, हात पाय हालवत होता. पण हा रीलचा भाग असावा असा समज त्याच्या मित्रांचा झाला आणि ते चित्रिकरण करतच राहिले. त्यामुळे कोणतीही मदत न मिळाल्याने तीर्थराज पाण्यात बुडाला.
हा संपूर्ण थरार मोबाईलमध्ये कैद झाला. या घटनेची माहिती मिळताच अड्याळ पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह बाहेर काढला आणि उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. या प्रकरणी तीर्थराजचा मृत्यू हा रील बनवताना खोल पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास अड्याळ पोलिस करत आहेत.
ही बातमी वाचा:























