(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भारतीय संविधानाला साक्ष मानून बांधली रेशीमगाठ, नवरीची लग्न मंडपात संविधानासह एन्ट्री; भंडाऱ्यातील विवाहाची जोरदार चर्चा
Bhandara Wedding : भारतीय संविधानाला साक्ष मानून स्वातंत्र, समता आणि बंधुता या संविधानिक तत्वप्रणालीचा अंगीकार करत भंडाऱ्यातील एक जोडपं विवाह बंधनात अडकलं.
भंडारा : विवाह सोहळा हा प्रत्येकांच्या आयुष्यातील आयुष्यभराचा संस्मरणीय सोहळा असतो. प्रत्येकजण विवाहाच्या सोहळ्यात काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. असाच एक विवाह भंडारा जिल्ह्यातील लाखनी इथं पार पडला. यात नवदांपत्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाची शपथ घेत विवाहाची रेशीमगाठ बांधली.
भंडारा जिल्ह्यात पार पडलेल्या विवाहापैकी हा एक प्रकारे सर्वांना आठवणीत राहील असा हा विवाह ठरला. या आदर्श विवाह सोहळ्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. अलीकडे विवाह मंडपात पाहुण्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी वेगवेगळ्या शक्कला लढवल्या जातात, त्यासाठी बक्कळ पैसा उडवला जातो. मात्र 'या' विवाह सोहळ्यात असा प्रकार नसला तरीही चर्चा मात्र जोमात आहे.
नववधू विवाहस्थळी वाजतगाजत आली, त्यावेळी तिच्या हातात बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले भारतीय संविधान होते. तिच्या हातात नेमक काय आणि कशाचं पुस्तक असावं, असा सर्वप्रथम सर्व उपस्थितांना प्रश्न पडला. मात्र नववधूने आणलेले पुस्तक विवाह स्थळी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शांतीचे प्रेरक असलेल्या तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेसमोर ठेवले.
लाखनी तालुक्याच्या पोहरा गावातील प्रांजल धनराज बडोले हिचा विवाह अमरावती जिल्ह्यातील पंकज धनराज पाटील यांच्याशी जुळला. विवाहाची तारीख ठरली आणि विवाह अशा प्रकारे त्यांनी आठवणीचा रहावा ही क्लृप्ती संस्मरणीय केली. विचाराने प्रगल्भ असलेल्या या नवविवाहित दाम्पत्यानं भारतीय संविधानाला साक्ष मानून आदर्श विवाह पार पाडण्याचा विचार केला आणि तो अमलातही आणला.
तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करून विवाह सोहळ्याला सुरूवात केली. त्यानंतर भारतीय संविधानाला साक्ष मानून स्वातंत्र, समता आणि बंधुता या संविधानिक तत्वप्रणालीचा अंगीकार करत सध्द्म्मात (चांगले कर्म, आचरण) जीवन जगण्याचा संकल्प देखील केला.
या विवाह सोहळ्याचं पुन्हा एक खास आकर्षण म्हणजे डॉ. बाबासाहेबांनी व्ही.एस. कर्डकांना आदर्श बौध्द विवाह समारंभ कसा असावा यासंदर्भात 4 डिसेंबर 1956 मध्ये पत्र लिहिलं होतं. त्याच पत्राला उद्देशून या आदर्श विवाह सोहळ्याचं आयोजन केलेलं होतं.
या विवाह सोहळ्याला बौद्ध भिक्खू आदरणीय नाथ पुन्नो, बौद्ध धम्माचे प्रचारक प्रा. सुभाष शेंडे, उपासिका नीता डोंगरे यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे लग्न समारंभाचं सुंदर सूत्रसंचालन नीशा रामटेके (शेंडे) आणि प्रभाकर सोनडवले यांनी केलं.
ही बातमी वाचा :