Buldhana News : लग्न मंडपात भरधाव ऑटोरिक्षा घुसल्याने एका वऱ्हाड्याचा मृत्यू, सजनपुरी परिसरात तणाव, दंगल नियंत्रण पथकासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
Buldhana News : लग्न मंडपात भरधाव ऑटोरिक्षा घुसल्याने एका वऱ्हाड्याचा मृत्यूखामगावातील सजनपुरी परिसरात तणाव.दंगा काबू पथकासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात.
Buldhana News : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्याच्या खामगाव शहरातील सजनपुरी परिसरात लग्न मंडपात भरधाव ऑटोरिक्षा (Autorickshaw) घुसल्याने एका वऱ्हाड्याचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी आहे. या घटनेनंतर सजनपुरी (Sajanpuri) परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. त्यामुळे दंगल नियंत्रण पथकासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. परिणामी परिसराला छावणीचं स्वरुप आलं आहे.
नेमकं काय घडलं?
खामगावातील सजनपुरी परिसरात मंगळवारी (30 मे) रात्रीच्या लग्न सोहळा पार पडत होता. रात्री नऊच्या सुमारास लग्न समारंभाच्या मंडपात भरधाव ऑटोरिक्षा घुसली. या घटनेत दोन वऱ्हाडी जखमी झाले. यातील एक पुरुष गंभीर जखमी झाल्याने त्याला सुरुवातीला खामगाव येथील सामान्य रुग्णालयात प्रथम उपचार केले. परंतु प्रकृतीत फारशी सुधारणा न झाल्याने त्याला अकोला येथील सर्वोच्च रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु रुग्णालयात नेत असतानाच रामू सावरकर या इसमाचा वाटेत मृत्यू झाला. यामुळे सजनपुरी परिसरात रात्री तणाव निर्माण झाला होता.
परिसरात दंगल नियंत्रण पथकासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त
ऑटोरिक्षा चालक विशिष्ट समाजाचा असल्याने आणि जखमी वऱ्हाड्याचा मृत्यू झाल्याने सजनपुरी परिसरात तणाव निर्माण झाला. यानंतर परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. या परिसरात दंगल नियंत्रण पथक आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
सोलापुरातील माढ्यात वऱ्हाडाची बस जळून खाक
तीन महिन्यांपूर्वी सोलापूरच्या (Solapur) माढा तालुक्यातील मोडलिम्ब इथे विवाहासाठी आलेल्या खाजगी बसने अचानक पेट घेतल्याने विवाह मंडपात अग्नितांडव झालं होतं. नागरिकांच्या सतर्कतेमुळे सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र या दुर्घटनेत बस जळून खाक झाली होती. 23 फेब्रुवारी रोजी रात्री पुणे इथून नवरदेवाचं वऱ्हाड या खाजगी बसमधून आलं होतं. वऱ्हाडी मंगल कार्यालयात उतरले आणि थोड्याच वेळात बसने अचानक पेट घेतला. तातडीने गाडीत बसलेल्या चालकाला खाली उतरवून नागरिक आणि वऱ्हाडी मंडळींनी आग विझवण्यास सुरुवात केली. दरम्यान शेजारी असणारी सर्व वाहनेही तातडीने हलवल्याने मोठी दुर्घटना टळली. रात्री उशिरा बसची आग विझवण्याचा यश आलं. परंतु तोपर्यंत ही बस जळून खाक झाली होती. सुदैवाने बसमधील वऱ्हाडी आधीच बसमधून उतरल्याने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
हेही वाचा