Vaibhavi Deshmukh : संतोष देशमुखांच्या लेकीचा पोलिसांवर आरोप! व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'तपासाबाबत पोलीस काहीच...'
Vaibhavi Deshmukh on Police : संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत, तर दुसरीकडे पोलिस, सीआयडी या घटनेचा तपास करत आहेत.
बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या (Santosh Deshmukh Murder Case) प्रकरणाने राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे. तर मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर (Walmik Karad) खंडणीचा गुन्हा करण्यात आला आहे. या प्रकरणात धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत, तर दुसरीकडे पोलिस, सीआयडी या घटनेचा तपास करत आहेत. दरम्यान या प्रकरणात होत असलेल्या तपासाची माहिती पोलिस देत नसल्याचा आरोप संंतोष देशमुख यांच्या मुलीने केला आहे.
संतोष देशमुख यांच्या मुलीकडून एक व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. हत्या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला याबाबत पोलीस सांगत नसल्याचा आरोप वैभवी देशमुखने केला आहे. विचारणा करूनही पोलीस तपासाबाबत सांगत नसल्याचा आरोप वैभवी देशमुखने या व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे. यापुढे होणाऱ्या तपासाची वेळोवेळी माहिती देण्याची विनंती देखील तिने केली आहे.
नेमकं काय म्हणाली वैभवी देशमुख?
आज माझ्या वडिलांना जाऊन एक महिना होऊन गेला पोलीस प्रशासनाचा जो तपास चालू आहे, त्याबद्दल आम्हाला काही कळवलं गेलं नाहीये. एका आरोपी अद्याप फरारच आहे. आम्ही कुटुंबीयांनी विचारपूस केली असता पोलीस तो तपास कुठपर्यंत आलाय त्याची माहिती देत नाहीत. तपास कोणत्या प्रकारे चालू आहे, याची माहिती त्यांनी सांगितलेली नाही. आजपर्यंत त्यांनी आम्हाला काहीही कळवलेलं नाही. पोलीस प्रशासनाला आणि सरकारला माझी एकाच विनंती आहे. पोलीस प्रशासनाचा जो तपास आहे, त्याबाबत आम्हाला वेळोवेळी कळवण्यात यावे, एवढी आमची विनंती आहे, असं वैभवी देशमुखने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.
वाल्मिक कराडानंतर आता मुलाच्या अडचणीही वाढणार
वाल्मिक कराडनंतर आता त्याचा मुलगा सुशील कराड देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. वाल्मिक कराडच्या मुलाविरोधात सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना या प्रकरणात FIR दाखल करण्याच्या सूचना न्यायलयाने द्याव्यात अशी अर्जाद्वारे मागणी केली आहे. ऑगस्ट महिन्यात सोलापूर न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला असून, या प्रकरणी सुनावणी सुरु आहेत, मात्र न्यायालयाने अद्याप FIR दाखल करण्यासंदर्भात कोणताही निर्णय दिलेला नाही. सुशील कराड याने त्याच्या मॅनेजरच्या घरात घुसून रिव्हॉल्वरचा धाक दाखवून दोन बल्कर ट्रक, दोन कार, परळीतील प्लॉट आणि सोने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सुशील वाल्मिक कराडसह त्याचे मित्र अनिल मुंडे आणि गोपी गंजेवार यांच्याविरुद्ध ही फिर्याद दाखल करून घेण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे. मॅनेजरच्या पत्नीने याबाबत सोलापूर पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक बीड यांच्याकडे तक्रार दिली मात्र त्याची दखल घेतली गेली नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे पीडित महिलेने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात दाद मागितली आहे.