(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Prakash Solanke : मोठी बातमी ! आमदार प्रकाश सोळंके यांच्या रत्नसुंदर मेमोरियल रुग्णालयाचा परवाना कायमस्वरुपी रद्द
Prakash Solanke : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या रुग्णालयाचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
बीड : बीड (Beed) जिल्ह्याचे माजलगावचे अजित पवार (Ajit Pawar) गटाचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांच्या रत्नसुंदर मेमोरियल रुग्णालयाचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात आला आहे. प्रकाश सोळंके यांच्या पत्नी अध्यक्ष या रुग्णालयाच्या अध्यक्ष आहेत. माजलगाव शहरातील बायपास रोडवर रत्नसुंदर मेमोरियल हॉस्पिटलला 2021 मध्ये परवाना देण्यात आला होता. 100 बेड्सचे हे रुग्णालय आहे. पण वास्तविक पाहता या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे रुग्णालय अस्तित्वाच नसल्याची तक्रार सुभाष नाकलगाकर यांनी बीड जिल्हा रुग्णालयाचे शैल्यचिकीत्सक डॉक्टर अशोक बडे यांच्याकडे केली. त्यानंतर या रुग्णालयाची चौकशी करण्यात आली. या चौकशीमधून रुग्णालय अस्तित्वात नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे त्यांच्या रुग्णालयाचा परवाना रद्द करण्यात आला.
माजलगाव विकास प्रतिष्ठानच्या माध्यामातून शहरातील सर्वे नंबर 372 ही जागा वादग्रस्त असूनही त्या ठिकाणी या रुग्णालयाचे बांधकाम करण्यात आले. दरम्यान त्यामुळे या रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम देखील वादग्रस्त ठरले होते. या इमारतीला माजलगाव नगरपालिकेचा बांधकाम परवाना हा 6/01/2023 चा आहे. तसेच बॉम्बे नर्सिंग अॅक्टनुसार 21 जून 2021 रोजी 100 बेड्सच्या या रुग्णालयाला परवाना देण्यात आला होता. पण या इमारतीचे बांधकाम अपूर्ण असल्याची बाब यावेळी निदर्शनास आली आहे.
तपासणीत आढळून आल्या त्रुटी
राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर प्रकाश सोळंके यांनी अजित पवार गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान कर्जतमध्ये आयोजित करण्यात आलेल्या चिंतन शिबीरात प्रकाश सोळंके यांच्या कार्याध्यक्षपदामुळे राजकीय वर्तुळात बरीच चर्चा झाली. त्यानंतर प्रकाश सोळंके यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली. पण त्याचवेळी त्यांच्या रुग्णालयाचा देखील परवाना रद्द करण्यात आला. वैद्यकीय तपासणीत काही त्रुटी आढळून आल्याने प्रकाश सोळंके यांच्या रुग्णालयावर ही करावाई करण्यात आल्याची माहिती समोर आलीये. त्यामुळे पुन्हा एकदा याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागलीये.
प्रकाश सोळंके यांच्या कार्याध्यक्षपदाच्या चर्चा
जयंत पाटलांनी मला राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदाचा शब्द दिला होता, पण त्यांनी तो फिरवला, आता अजित पवारांनी प्रदेशाध्यक्ष करावं, हे म्हणजे जयंत पाटलांनी घाण करायची आणि अजित पवारांनी ती साफ करायची अशी घणाघाती टीका आमदार प्रकाश सोळंके यांनी केली. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असून राज्याचं राजकारण त्यामुळे ढवळून निघाल्याचं दिसून येतंय.