Beed News: अन् पंकजा मुंडेंचा मतदान केंद्रावरच नाश्ता, कार्यकर्त्यांसोबत समोसा खाण्याचा घेतला आनंद
Beed News : पंकजा मुंडे यांनी यावेळी कार्यकर्त्यांसोबत समोसा खाण्याचा आनंद घेतला.
Beed News : बीडच्या परळीमधील जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे आमदार तथा माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि भाजप नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) या दोघांमध्ये थेट लढत पाहायला मिळाली. दरम्यान सकाळीच मतदानाच्या वेळी पंकजा मुंडे वैद्यनाथ कॉलेज येथील मतदान केंद्रावर स्वतः कार्यकर्त्यांसह बसून होत्या. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी मतदानाचा आढावा घेत मतदान केंद्रावरच नाश्ता केला. तर पंकजा मुंडे यांनी यावेळी कार्यकर्त्यांसोबत समोसा खाण्याचा आनंद घेतला.
परळीतील बहुचर्चित जवाहर शिक्षणसंस्थेच्या एकूण 34 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. मात्र पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची बिनविरोध निवड झाल्याने 32 जागांसाठी आज मतदान प्रकिया पार पडली आहे. तर यासाठी एकूण 1221 मतदार मतदानाचा हक्क बजावणार होते. मात्र आज होत असलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे सकाळीच मतदान केंद्रावर पोहचल्या होत्या. मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी कार्यकर्त्यांकडून संपूर्ण आढावा घेतला. दरम्यान यावेळी त्यांनी सकाळचा नाश्ता देखील मतदान केंद्रावरच केला. कार्यकर्त्यांसाठी आणलेले समोसा खाण्याचा आनंद त्यांनी घेतला.
विशेष म्हणजे बाजार समितीच्या निवडणुकीत देखील पंकजा मुंडे मतदान केंद्रावर ठाण मांडून बसल्या होत्या. मात्र त्या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे यांनी एकेरी वर्चस्व प्रस्थापित करत त्यांना मोठा धक्का दिला होता. त्यामुळे आता महाविद्यालयाच्या या निवडणुकीमध्ये नेमका कोणाचा विजय होणार, हे निकालनंतर स्पष्ट होणार आहे. मात्र पंकजा मुंडे स्वतः मतदान केंद्रावर बसून असल्याने या निवडणुकीला मोठे महत्त्व प्राप्त झाल आहे.
तब्बल 16 वर्षानंतर पहिल्यांदाच निवडणूक होत आहे...
परळी शहरातील जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीसाठी आज सकाळपासूनच मतदान प्रकिया पार पडली आहे. पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेले वैद्यनाथ महाविद्यालय ताब्यात घेण्यासाठी यापूर्वी धनंजय मुंडे यांनी अनेक वेळा प्रयत्न केले. पण एका न्यायालयीन प्रक्रियेमुळे या महाविद्यालयाचे निवडणूक प्रक्रिया रखडली होती. मात्र आता तब्बल सोळा वर्षानंतर पहिल्यांदाच न्यायालयाच्या आदेशाने आज प्रत्यक्ष निवडणूक पार पडली आहे. त्यामुळे या निवडणुकीत आता दोन्ही पैकी कोणाची सत्ता येणार हे पाहणं महत्वाचे ठरणार असून, बीड जिल्ह्याचे याकडे लक्ष लागले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
परळीतील बहुचर्चित जवाहर शिक्षणसंस्थेसाठी आज मतदान; मुंडे बहिण भावात सामना रंगणार