Beed Maratha Protest : बीडमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचा वणवा पेटला; आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बंगल्यासह राष्ट्रवादी भवनची जाळपोळ
Beed Maratha Protest : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीडमध्ये हिंसक आंदोलन सुरू आहे.
बीड : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी उपोषण आंदोलन सुरू केले असताना दुसरीकडे राज्यात काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडत आहेत. बीडमध्ये (Beed) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके (MLA Prakash Solanke) यांच्या बंगल्यावर दगडफेक आणि आवारातील वाहनांना आग लावण्याची घटना समोर आली. त्यानंतर आता बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय 'राष्ट्रवादी भवन' पेटवून दिले असल्याची घटना समोर आली आहे. त्याशिवाय, मराठा आंदोलकांनी राजकीय पक्षांशी संबंधित हॉटेल, संस्थांच्या कार्यलयाच्या जाळपोळ झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
बीडमध्ये संतप्त जमावाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर (MLA Sandeep Kshirsagar) आणि ओबीसीचे ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर (Jaydutt Kshirsagar) हे राहत असलेल्या बंगल्याला आग लावली आहे. बीडमध्ये सुरू असलेल्या 'या' जाळपोळीच्या घटनांमुळे बीडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याआधी मराठा आंदोलकांच्या जमावाने क्षीरसागर कुटुंबीयांच्या ताब्यात असलेल्या केएसके कॉलेजच्या संस्था कार्यालयाला आग लावली.
समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष राऊत यांच्या हॉटेलची जाळपोळ
धुळे-सोलापूर हायवेवर बीड शहरानजीक असलेल्या 'हॉटेल सनराइज'ला संतप्त जमावाने आग लावली आहे. समता परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष अॅड. सुभाष राऊत यांच्या मालकीचे हॉटेल आहे.
बीड शहरामध्ये रस्त्यावरच्या उभ्या मोटरसायकल पेटवल्या
बीड शहरातील सुभाष रोड या मुख्य बाजारपेठेत जमावाने दगडफेक केल्यानंतर बीड शहरातील सगळी बाजारपेठ बंद करण्यात आली आहे यावेळी सुभाष रोडवर लावलेल्या दोन मोटरसायकल हे जमावांने पेटवून दिले आहेत.
वडवणी शहर कडकडीत बंद
मराठा आरक्षणासाठी बीड तालुक्यातील वडवणी शहर आणि तालुका कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे तर मराठा आंदोलकांनी वडवणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बीड परळी रोडवर आरक्षणाच्या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन केले. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी वडवणी मध्ये कालपासून मराठा बांधवांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. आज आरक्षणाच्या मागणीसाठी तालुका बंदची हाक देण्यात आली आहे त्यामुळे वडवणी शहरातील बाजारपेठ ही कडकडीत बंद ठेवण्यात आलीय.. तर दुसरीकडे आंदोलकांनी बीड परळी रोडवर असताना मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.