Maonj Jarange Patil : प्रकरण दाबायच्या भानगडीत पडू नका, जिल्ह्यातील छाती बडवून घेणाऱ्या नेत्यांना सांगतो.. आत टाका...
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण प्रकरणी आरोपींना शिक्षा करण्याची मागणी केली आहे.
बीड : बीडच्या केज तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करण्यात आला. या प्रकरणी मनोज जरांगे पाटील यांनी मसाजोग गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला आहे. संतोष देशमुख यांच कुटुंब उघड्यावर पडले असून त्यांना न्याय मिळणे आवश्यक आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. कुटुंबाकडून सीआयडी चौकशीची मागणी केली जात आहे. सदरील प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
हे प्रकरण दाबण्याच्या भानगडीत पडू नका. या प्रकरणात जातीचे लोक पाठीशी घालू नका. हा रास्ता रोको नाही तर न्यायाची प्रक्रिया आहे. महाराष्ट्रातील जनतेने संयम दाखवावा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांनी हा विषय तातडीने हाताळावा, तुम्ही संवेदनशील असाल तर हे शांततेत हाताळा. 24 तास उलटून देखील अद्याप मृतदेहावर अंत्यसंस्कार झालेले नाही. त्यामुळे हे प्रकरण गंभीरपणे घेणे गरजेचे असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे काय म्हणाले?
प्रकरणाची माहिती घेत आहे, माझ्या समाजाचं लेकरु मारलं गेलं आहे. मारेकऱ्यांना सुट्टी द्यायची नाही ही आमची मागणी आहे. न्याय मिळणार, न्याय घेणार, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. मराठ्यांचे पोरं मारुन टाकले जातात असे मेसेज फिरु लागले. मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. राज्यातील शांतता भंग झाली तर याला मुख्यमंत्री जबाबदार राहतील. आमचं लेकरु मारुन टाकण्यात आलं, त्याचा मर्डर झाला, ते आरोपी मोकाट असतील. एफआयआर म्हणण्याप्रमाणं लिहून घेत नसाल, दोन पोलीस अधिकारी निलंबित करण्याची मागणी आहे, त्यांना निलंबित करणार नसाल, राज्य दूषित करणार असाल तर राज्यासाठी चांगली बाब नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.
न्याय पाहिजे म्हणून लोक रस्त्यावर बसले आहेत, तो रास्ता रोको नाही. या लोकांना न्याय देणार नसाल तर सरकारनं विचार करणं गरजेचं आहे, असंही मनोज जरांगे म्हणाले. आरोपीला जात नसते हे लक्षात ठेवावं, असं मनोज जरांगे म्हणाले. आरोपींना पाठिशी घालू नका, समाजाचा संयम सुटला तर जड जाईल, मराठ्यांच्या भावनेशी खेळत जाऊ नका, आरोपींना अटक करा, त्यांना फाशीची शिक्षा द्या, हे प्रकरण जातीत तोलू नका, असं मनोज जरांगे म्हणाले.
ही लोकं न्याय मागत आहेत, रास्ता रोको असता तर धिंगाणा झाला असता. गावचं लेकरु मारुन टाकलं आहे. सीआयडी चौकशी करा, प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करु नका, जिल्ह्यातील छाती बडवणाऱ्या नेत्यांना निक्षून सांगतो याला रास्ता रोको समजू नका, जातीत तोलू नका, जातीचे लोक पाठिशी घालू नका आत टाका, हे लोक शांततेनं बसलेत. मराठ्यांनी शांततेत राहायचं आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
इतर बातम्या :