जरांगे-पाटलांना पाहताच अर्जुनच्या वडिलांच्या अश्रुंचा बांध फुटला, मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाचं बलिदान
मनोज जरांगे पोहचताच कवठेकर कुटुंबाने एकच टाहो फोडला. तर कुटुंबीयांना पाहून मनोज जरांगेंना देखील अश्रू अनावर झाले.
बीड : बीडच्या जिल्हा परिषद कार्यालय परिसरात झाडाला गळफास घेतलेला एक मृतदेह आढळून आला. अर्जुन कवठेकर असं या तरुणाचे नाव असून मराठा आरक्षणाची मागणी करत या तरुणाने आत्महत्या केली होती. दरम्यान घटनेची माहिती मनोज जरांगे पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी शासकीय जिल्हा रुग्णालयात जाऊन कवठेकर कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले आहे.
मनोज जरांगे पोहचताच कुटुंबाने एकच टाहो फोडला. तर कुटुंबीयांना पाहून मनोज जरांगेंना देखील अश्रू अनावर झाले. यावेळी अर्जुन कवठेकर यांचे यांचे वृद्ध आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी आणि अन्य नातेवाइकांनी हंबरडा फोडला. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी सुनीलची भावना होती आणि ते आरक्षण मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालीच मिळू शकेल असा विश्वासही त्यांना होता, असे त्यांच्या नातेवाइकांनी जरांगे यांना सांगितले. जरांगे यांनी तासभर बसून कावळे कुटुंबीयांचे सांत्वन केले. सांत्वन करताना जरांगे यांचे डोळेही पाणावले होते. त्यांच्याशी संवाद साधताना मराठा समाज कवठेकर कुटुंबीयांना उघड्यावर सोडणार नाही. समाजासाठी दिलेले बलिदान समाज कदापि विसरणार नाही, अशी ग्वाही दिली.
पोलीस अधिक तपास करत आहे
आज सकाळच्या सुमारास जिल्हा परिषद कार्यालय परिसरात एका लिंबाच्या झाडाला अर्जुन कवठेकर यांचा गळफास घेतलेला मृतदेह आढळून आला. त्यांच्या खिशामध्ये एक सुसाईड नोट आढळून आली असून त्यात सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही.. दिलेल्या शब्द पाळत नाही.. त्यामुळे मराठा बांधवांनी एकजूट व्हावे.. असा मजकूर लिहून त्यांनी आत्महत्या केल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. अर्जुन कवठेकर हे उखंडा गावचे रहिवासी असून ते खाजगी बसवर चालक होते. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल कोणीही उचलू नका, मनोज जरांगेंचे आवाहन
मराठ आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यासाठी आत्महत्यांची सत्र सुरू आहे. मनोज जरांगे यांनी त्यांच्या समर्थकांना आत्महत्येसारखे पाऊल न उचलण्याचे आवाहन केलं आहे. आरक्षण तुमच्यासाठी आहे. तुम्ही माझ्यासाठी परिवारापेक्षाही जास्त आहेत. आपल्याला मरायचे नाही, लढायचे आहे, त्यामुळे कोणीही टोकाचे पाऊल उचलू नये. आत्महत्या केल्याने आपल्याला न्याय मिळणार नाही, असे मनोज जरांगे म्हणाले
दसऱ्याला नारायणगडावर मनोज जरांगेंचा मेळावा
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. धुळे सोलापूर महामार्गावर शहागड येथील पैठण फाटा येथे मनोज जरांगे यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. गेल्या अनेक दिवसापासून याचं काम सुरू होतं, दरम्यान नारायण गडावरील दसरा मेळावाच्या निमित्ताने मनोज जरांगे हे धाराशिव आणि परभणी जिल्ह्यातील आंदोलकांसोबत बैठक घेणार आहेत.