Manoj Jarange: 'सरकारचे कोण-कोणते मंत्री, आमदार...',संतोष देशमुख प्रकरणावर मनोज जरांगेंचा मोठा दावा; नार्को टेस्ट करण्याची केली मागणी
Manoj Jarange: संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा आकडा हा 50 च्यावरती जाऊ शकतो असा दावा देखील मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
परभणी: आज संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणाचा निषेध नोंदवण्यासाठी परभणीमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी अनेक पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) देखील उपस्थित होते. त्यांनी परभणीमध्ये संतोष देशमुखांच्या (Santosh Deshmukh) कुटूंबाची भेट घेतली आहे. यावेळी सर्व आरोपींची नार्को टेस्ट करा अशी मागणी देखील मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी केलेली आहे. आरोपींची पाठराखण करणाऱ्यांवरतीही कारवाई करा असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा आकडा हा 50 च्यावरती जाऊ शकतो असा दावा देखील मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणात सरकारमधील मंत्री देखील असू शकतात असंही ते पुढे म्हणालेत.
नेमकं काय म्हणालेत मनोज जरांगे?
त्या आरोपींना आत्तापर्यंत कोणी सांभाळलं. त्यांना देखील अटक करायला पाहिजे. संतोष देशमुख यांची क्रुरपणे हत्या झाली. त्यांना सांभाळणारे नेमके कोण आहेत, कोणाच्या तरी लेकाचा, एका मुलीच्या बापाचा निर्घृणपणे हत्या केली. त्यांना सांभाळलं जात आहे, त्यामुळे आरोपींना आश्रय देणारे आणि त्यांचा सांभाळ करणारे यांना सोडलं नाही गेलं पाहिजे. यामध्ये मोठं रॅकेट आहे. खंडणीतील आरोपीच्या नार्को टेस्ट केल्या तर शंभर टक्के यामध्ये सरकारचे कोण-कोणते मंत्री, आमदार आहेत, ते समोर येणार आहे, असा दावा देखील मनोज जरांगे यांनी केला आहे.
सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे पोलिसांच्या ताब्यात
हत्या प्रकरणातील फरार आरोपींपैकी प्रमुख सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांनाही बीडच्या पोलिसांनी शुक्रवारी रात्री पुण्यातून ताब्यात घेतले आहे. तर या आरोपींना सरपंचाचे लोकेशन पुरविणारा मस्साजोग गावातीलच सिद्धार्थ सोनवणे याला देखील मुंबईतून बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. यापूर्वीच जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले यांना अटक केली. सध्या प्रकरणात कृष्णा आंधळे हा फरार आहे.
संतोष देशमुखांचं लोकेशन देणारा सिद्धार्थ सोनवणे सापडला
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यासाठी त्यांचे लोकेशन देणारा मस्साजोग येथीलच सिद्धार्थ सोनवणे याच्या देखील स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी कल्याण (मुंबई) येथून एका उसाच्या गाडीवर काम करत असताना मुसक्या आवळल्या आहेत. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा आता पूर्णपणे उलगडा होण्यास मदत होणार आहे. सिद्धार्थ सोनवणे हा फरार झाल्यानंतर मुंबईत लपून बसला होता. त्याने या काळात वेगवेगळी पाच सिम कार्ड देखील वापरली होती. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना त्याचे मुंबईतील लोकेशन मिळताच त्या ठिकाणी त्यांनी सापळा लावला. एका मोकळ्या पटांगणात उसाच्या गाड्यावर काम करत असतानाच पोलिसांनी त्याच्यावर झडप मारली.