Vidhan Parishad:'उमेदवारी न मिळाल्याने बडबडत बसायचं, बाजूला व्हायचं...'; मेटेंचा निशाणा कुणावर
Vidhan Parishad Elections 2022: विनायक मेटे यांनी पंकजा मुंडेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
Vidhan Parishad Elections 2022: राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषद निवडणूक होणार आहे. मात्र या निवडणुकीपूर्वीच भाजपमध्ये नाराजी नाट्यावरून मोठा गोंधळ पाहायला मिळत आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा डावलण्यात आल्याने त्यांचे समर्थक आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. तर यावरून शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांनी पंकजा मुंडेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. उमेदवारी मिळाली नाही म्हणून बडबडत बसायचं हे आमच्या बापजाद्यांनी शिकवलं नाही असा खोचक टोला मेटे यांनी लगावला.
काय म्हणाले मेटे...
भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा ताफा काही येड्या लोकांनी अडवण्याचा प्रयत्न केला. चांगल्या कामासाठी जाताना काही येडे लोकं आडवी येतच असतात. तसेच उमेदवारी मिळाली म्हणून, नाराज होऊन लगेच बाजूला व्हायचं आणि काहीही बडबडत बसायचं, काहीही करायचं, काहीही उपटसुंभ उद्योग करायचे हे आमच्या बापजाद्यांनी शिकवलं नाही. आमची इमानदारीची औलाद असून, बेमानीची औलाद नाही. एखाद्याला शब्द दिला, हातात हात दिला तर शेवटपर्यंत त्याचा हात सोडत नाही. पाठीत सुरा खुपसणारी आमची औलाद नाही. त्यामुळे देवेंद्र फडणीस यांना आम्ही शब्द दिला आहे की, तुमच्या सोबत शेवटपर्यंत प्रामाणिकपणे असणार असून कुणी असेल किंवा नसेल, असे मेटे म्हणाले.
आता मागयाच नाही, लढायचं...
याचवेळी पुढे बोलताना मेटे म्हणाले की, मित्र जरी असले तरीही कशाला कुणाला काही मागयाच. आपणच आपल्या हक्काची आमदारकी आता 2024 ला मिळवायची आहे. त्यामुळे त्या दिशेने आपल्यलाल काम करायचं असल्याच म्हणत, मेटेंनी विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहे. मात्र कोणत्या मतदारसंघातून रिंगणात उतरणार हे यावर मात्र मेटे काही बोलले नाही.
पंकजा मुंडे समर्थक नाराज...
विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर करताना पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना डावलण्यात आले आहे. त्यामुळे राज्यभरातील 'पंकजा समर्थकांक'डून संताप व्यक्त केला जात आहे. औरंगाबादमध्ये आधी भाजप कार्यालयासमोर पंकजा यांच्या समर्थकांनी राडा घातला. त्यांनतर काल पुन्हा केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या कार्यालयासमोर असाच राडा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. तिकडे बीडमध्ये प्रवीण दरेकरांच्या ताफ्यासमोर मुंडे समर्थकांनी घोषणाबाजी करत दरेकरांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे जालन्यात सुद्धा पंकजा मुंडे यांच्या समर्थकांकडून आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले आहे.