Beed : बीडच्या कारागृहातही वाल्मिकची गँग जमली, रोज मैफील अन् सात हवालदार दिमतीला; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
Santosh Deshmukh Murder Case : बीडमधील वाल्मिक कराडची गँग स्वतःवर गुन्हा दाखल करुन कोठडीत जात आहे. त्याच्या दिमतीला सात हवालदार असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.
बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि प्रशासनाच्या लागेबंधाची रोज नवीन माहिती समोर येत आहे. आताही आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यासंबंधी सोशल मीडियावरून सनसणाटी आरोप केले आहेत. बीडच्या कारागृहात असलेल्या वाल्मिक कडाच्या दिमतीला सात पोलिस हवालदार असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच कराडच्या गँगमधील छोटे-मोठे गुन्हेगार तुरुंगातही जमले असून त्यांची रोज मैफील जमत असल्याचा आरोपही आव्हाडांनी केला.
कायद्याने जामीन नाकारलेल्या एखाद्या आरोपीच्या दिमतीला एवढे हवालदार आहेत हे या आधी महाराष्ट्राने कधीही पाहिले नाही असं जितेंद्र आव्हाड म्हणतात. वाल्मिक कराड हा सरकारपेक्षाही मोठा असून त्याने तुरुंगातही निवांत राहावं असाच निर्णय शासन दरबारी झाल्याचा दिसतोय असा आरोप आव्हाडांनी यावेळी केला.
Jitendra Awhad Tweet On Walmik Karad : जितेंद्र आव्हाडांचा आरोप काय?
हॉस्पिटलमधून बाहेर काढलेल्या वाल्मिक कराडला आता बीडच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. बंदीवासात त्याच्या दिमतीला सात हवालदार तैनात ठेवलेले आहेत. बीडमधील त्याच्या गँगमधील छोटे-मोठे गुन्हेगार मुद्दामहून स्वतःवर एखादा गुन्हा ओढावून घेतात अन् या गुन्हेगारांची रवानगी बीड मध्यवर्ती कारागृहात होते. बीड कारागृहात ते 'आपोआप' वाल्मिक कराडच्या जवळ पोहचतात आणि मग, रात्री मस्त मैफिल रंगत असते. एकंदरीत तो कारागृहात आहे, अशी भावनाच त्याच्या मनात निर्माण होऊ द्यायची नाही, असा निर्णय शासन दरबारी झालेला दिसतो. बाकी महाराष्ट्रात आजपर्यंत असे कधी बघितलेले नाही की, कायद्याने जामीन नाकारलेल्या इसमाला एवढे हवालदार दिमतीला तैनात केले आहेत ! अर्थात, तो वाल्मिक कराड आहे... वाल्मिक खडा तो वो सरकारसे बडा !! थोडी तरी लाज बाळगा.
हाॅस्पीटलमधून बाहेर काढलेल्या वाल्मिक कराडला आता बीडच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. बंदीवासात त्याच्या दिमतीला सात हवालदार तैनात ठेवलेले आहेत. बीडमधील त्याच्या गँगमधील छोटे - मोठे गुन्हेगार मुद्दामहून स्वतःवर एखादा गुन्हा ओढावून घेतात अन् या गुन्हेगारांची रवानगी बीड…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 27, 2025
बीडमध्ये 26 पोलिस वाल्मिक कराडच्या मर्जीतले
भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनीही वाल्मिक कराड आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या संबंधावर आरोप केले आहेत. बीडमधील 26 पोलिस अधिकारी वाल्मिक कराडच्या मर्जीतील आहेत असा आरोप त्यांनी केला. तसेच या सर्व अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली करण्याची मागणीही त्यांनी केली.
सुदर्शन कराड पुन्हा पोलिस कोठडीत
सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेच्या पोलीस कोठडीत 31 जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. याआधी सुदर्शन घुलेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आता न्यायालयीन कोठडीतून सुदर्शन घुलेची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. सुदर्शन घुलेच्या मोबाईलमधील डाटा फॉरेन्सिक विभागाकडून रिकव्हर करण्यात आला आहे. त्यामुळे त्याची चौकशी करण्यासाठी त्याची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात येणार आहे. सुदर्शन घुलेनं पोलिस कोठडीत तपासात कोणत्याही प्रकारचं सहकार्य केलेलं नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
ही बातमी वाचा: