Samvardhan Award : देशभरातून आलेल्या आणि स्थानिक लोकजीवनाशी एकरुप झालेल्यांच्या सत्काराची गंगा-जमुनी परंपरा!
Beed News : मागील 10 वर्षांपासून आंतरभारती संस्थेकडून हा पुरस्कार देण्यात येतो.
Beed News : नेपाळहून (Nepal) येऊन आंबाजोगाईत स्थायिक झाले, जवळपास न शिकलेला या माणसाने आपल्या मुलीला पदवीधर केले. मुलगा इंजिनियर केला. विशेष म्हणजे रात्र प्रहरी म्हणजेच नाईट वॉचमनची नोकरी करून आपल्या मुलांना उच्चशिक्षित केले. आपलं राज्य सोडून महाराष्ट्रातील एका ग्रामीण भागात आल्यावर स्थानिक लोकजीवनाशी एकरुप झालेल्या अशा लोकांचा आगळावेगळा सत्कार करण्याची परंपरा बीडच्या (Beed) आंबाजोगाईत पाहायला मिळते. मागील 10 वर्षांपासून आंतरभारती संस्थेकडून हा पुरस्कार देण्यात येतो. यंदा हा पुरस्कार नरपती कुंजेडा यांना हैदराबादच्या मनीषा राणी आर्य व आंतरभारतीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा किसान पुत्र अमर हबीब (Amar Habib) यांच्या प्रमुख उपस्थित देण्यात आले.
15 ऑगस्ट 23 रोजी आंतरभारती आंबाजोगाईच्या वतीने दरवर्षीप्रमाणे स्नेहसंवर्धन पुरस्कार देऊन विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. अन्य प्रांतातून येऊन आंबाजोगाई येथे स्थायिक झालेल्या व आंबाजोगाईच्या गौरवात भर घालणाऱ्या व्यक्तीला दर वर्षी 15 ऑगस्टला हा पुरस्कार दिला जातो. यंदा दहावा पुरस्कार होता. तर यंदाचा हा पुरस्कार नेपाळहून येऊन अंबाजोगाईत स्थायिक झालेले नरपती कुंजडा यांना देण्यात आला. तर, यावेळी नरपती कुंजडा यांच्या पत्नी चंद्रकलाताई यांचा सत्कार मनीषा आर्य यांनी केला. विशेष म्हणजे, काही वर्षांपूर्वी नेपाळहून येऊन आंबाजोगाईत स्थायिक झालेल्या नरपती कुंजडा यांनी परिसरात नाईट वॉचमनची नोकरी करुन आपल्या मुलांना उच्चशिक्षित केले. नेपाळहून येऊन अंबाजोगाईच्या स्थानिक लोकजीवनाशी एकरुप झालेल्या नरपती कुंजडा यांचा सत्कार करुन गंगा-जमुनी परंपरा कायम ठेवण्याचे काम आंतरभारतीकडून करण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी पूर्व सत्कारमूर्ती शशिकांत रुपडा (गुजरात), आनंद अंकम (तेलंगणा), राजू जांगीड (राजस्थान) मंचावर उपस्थित होते.
कौतुकास्पद उपक्रम...
अनेकदा परप्रांतीय नागरिकांना विरोध केला जातो. तर बऱ्याचदा त्यांना वाईट वागणूक दिली जाते. मात्र, अनेकजण आपले राज्य सोडून महाराष्ट्रात आल्यावर स्थानिक लोकजीवनाशी एकरुप होताना पाहायला मिळतात. त्यांच्या अनेक पिढ्या आपल्या राज्याचा भाग बनतात. आपल्या स्थानिक संस्कृतीशी ते स्वतःला जोडून घेतात. आपल्या सणासुदीत सहभाग नोंदवतात. त्यामुळे राज्याच्या सामजिक जीवनात त्यांचा देखील मोलाचा वाटा पाहायला मिळतो. अशाच लोकांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सत्कार करुन, गंगा-जमुनी परंपरा कायम ठेवणाऱ्या आंतरभारती संस्थेचं उप्रकम कौतुकास्पद ठरत आहे.
विद्यार्थ्यांचा सन्मान
दरम्यान यावेळी महात्मा गांधी प्रश्नावली परीक्षेत उत्तम कामगिरी करणाऱ्या गावातील नववीच्या निवडक विद्यार्थ्याना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत ऋषिकेश मुंडे (मराठी), संपदा वाघ (इंग्रजी) व फुरखान सादेख अली (उर्दू) सर्वप्रथम निवडले गेले. 14 मराठी, 8 इंग्रजी व 6 उर्दू माध्यमाच्या शाळांनी यात भाग घेतला होता. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन ज्योती शिंदे यांनी केले. अनिता कांबळे यांनी परिचय करुन दिला. डॉ. पद्माकर घोरपडे यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. महावीर भागरे (संयोजक) यांनी आभार मानले. सहसंयोजक शरद लंगे यांनी प्रास्ताविक भाषण केले. शाखा अध्यक्ष दत्ता वालेकर अध्यक्षस्थानी होते, सचिव वैजनाथ शेंगुळे, अनिकेत डिघोळकर आदींनी कार्यक्रमाची तयारी केली. अंबाजोगाईकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गांधी विसरुन चालणार नाही : अमर हबीब
महात्मा फुले यांनी एकमय लोक झाल्याशिवाय देश निर्माण होणार नाही असे म्हटले होते. महात्मा गांधी यांनी विखुरलेल्या भारतीयांना देश म्हणून एकत्र आणले होते. महात्मा गांधींना सोडून या देशाची कल्पना देखील करता येणार नाही. गांधी पुसून टाकण्याचे प्रयत्न देशाला महाग पडतील असे मत आंतरभारतीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अमर हबीब यांनी या प्रसंगी व्यक्त केले. ‘हम सब एक हैं’ ही भावना दृढ करण्यासाठी स्नेहसंवर्धन पुरस्कार दिला जातो असे त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या: