Beed News : ताप आला अन् अधिकारी होण्याचं राजेशचं स्वप्न अपूर्णच राहिलं...
वडिलांचे कष्ट आणि आपल्या संघर्षातून मिळवलेले यश राजेशला यशाच्या शिखरावर घेऊन जाणार होतं. मात्र नियतीला हे मान्य नसावं आणि रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या राजेशला एक दिवस तापाने गाठलं.
बीड : वडिलांचे कष्ट आणि स्वतःच्या संघर्षातून चिखल बीडच्या राजेश तोगे याने एमपीएससीमार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब या पूर्व परीक्षेत यश मिळवल्यानंतर तो औरंगाबाद इथे मुख्य परीक्षेची तयारी करत होता. परंतु या दरम्यानच त्याला तापाने गाठलं. परंतु ध्येय समोर असल्याने त्याने तापाकडे दुर्लक्ष करुन अभ्यास सुरुच ठेवला. मात्र इथेच घात झाला, तापाने मेंदूत शिरकाव केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि अधिकारी होण्याचं राजेशचं स्वप्न अपूर्णच राहिलं.
घरची परिस्थिती हलाखीची असताना देखील बीड जिल्ह्यातल्या चिखल बीड येथील राजेश तोगे याने अधिकारी होण्याचं स्वप्न पाहिलं आणि तो जिद्दीला पेटला. आपल्याकडे असलेल्या एक एकर जमिनीत उदरनिर्वाह होत नसल्याने राजेशचे वडील श्रीराम दोघे सहा महिने ऊस तोडण्याचे काम करत होते आणि यातूनच मिळणाऱ्या पैशातून त्यांनी राजेशला पुढच्या शिक्षणासाठी औरंगाबाद या ठिकाणी पाठवलं. तिथूनच बापाच्या कष्टाला आणि राजेशच्या संघर्षाला सुरुवात झाली.
औरंगाबादमध्ये एमपीएससीची तयारी करणाऱ्या राजेशचा पदवीचा निकाल गेल्या वर्षी लागला. त्याने अधिक जोमाने पुढच्या अभ्यासक्रमाला सुरुवात केली. काही दिवसापूर्वी एमपीएससीमार्फत झालेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब या पूर्व परीक्षेत त्याने घवघवीत यश मिळवलं होतं. त्यानंतर त्याने पंधरा दिवसांपूर्वीच मुख्य परीक्षेचा अर्ज भरुन अभ्यास सुरु केला.
वडिलांचे कष्ट आणि आपल्या संघर्षातून मिळवलेले यश राजेशला यशाच्या शिखरावर घेऊन जाणार होतं. मात्र नियतीला हे मान्य नसावं आणि रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या राजेशला एक दिवस तापाने गाठलं. राजेशने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि आपला अभ्यास सुरुच ठेवला. रात्री अचानक त्याची प्रकृती खालावल्याने त्याच्या मित्रांनी त्याला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. डॉक्टरांनी तपासण्या केल्यानंतर तापाने मेंदूत शिरकाव केल्याने कुठल्याही उपचाराला राजेश साथ देत नव्हता. त्यामुळे त्याला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि तिथेच उपचार सुरु असताना राजेशचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ऊसतोड कुटुंबात जन्माला आलेल्या राजेशने अधिकारी होण्याचं स्वप्न पाहिलं. त्यासाठी त्याने संघर्ष केला काही प्रमाणात यश देखील मिळवलं, मात्र अधिकारी होण्याआधीच काळाने त्याच्यावर झडप घातली. राजेशचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने बीड जिल्ह्यात सर्वत्रच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.