(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Beed News : उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेली नगर आष्टी रेल्वे तीन महिन्यापासून एकाच जागेवर उभी
जवळपास तीस वर्षानंतर बीडकरांचं रेल्वेच स्वप्न कुठेतरी साकार होत आहे. मात्र अचानक सगळे मुहूर्त लांबले आणि आता सात महिन्याचा कालावधी लोटला तरीही रेल्वे सुरू होण्याच्या हालचाली दिसत नसल्याने अनेकांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
बीड : नगर-बीड-परळी या रेल्वेमार्गावरील नगर ते आष्टी असा 61 किलोमीटरच्या कामाचा टप्पा पूर्ण झाला असून त्यावर यशस्वी रेल्वेची चाचणीही करण्यात आली आहे. आता मात्र नगर ते आष्टी रेल्वेच अधिकृत उद्घाटन करण्यास मंत्री आणि पदाधिकाऱ्यांची वेळ मिळत नसल्याने उद्घाटन लांबणीवर पडत आहे. त्यामुळे या मार्गावर धावणारी रेल्वे नगर रेल्वे स्थानकावर तीन महिन्यापासून एकाच जागेवर उभी आहे. याकडे बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी विशेष लक्ष घालून आष्टी नगर रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी प्रवासी करत आहेत.
बीड जिल्ह्यातील रेल्वे प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा आहे जवळपास तीस वर्षानंतर बीडकरांचं रेल्वेच स्वप्न कुठेतरी साकार होत आहे. नगर ते आष्टी या 61 किलोमीटर अंतरावर 29 डिसेंबर 2021 रोजी रेल्वेची यशस्वी चाचणी घेण्यात आली. त्यानंतर 3 फेब्रुवारी 2022 रोजी प्रवासी रेल्वे सुरू होण्याचा दोन वेळेस मुहूर्त ठरला. परंतु ऐनवेळी अचानक सगळे मुहूर्त लांबले आणि आता सात महिन्याचा कालावधी लोटला तरीही रेल्वे सुरू होण्याच्या हालचाली दिसत नसल्याने अनेकांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
आष्टी नगर रेल्वे सुरू करण्यासाठी नगर रेल्वेस्थानकामध्ये गेल्या तीन महिन्यापासून नऊ डब्याची रेल्वे गाडी उभी आहे. नगर स्थानकावर अजून किती दिवस ही रेल्वे उभी राहणार असा प्रश्न नागरिकांना पडत आहे त्यामुळे बीडच्या राजकीय नेत्यांनी याकडे लक्ष देऊन तात्काळ नगर ते आष्टी रेल्वे सुरू करावी अशी मागणी सर्व स्तरातून होऊ लागली आहे
नगर ते आष्टी रेल्वेच्या अशा झाल्या चाचण्या
नगर ते नारायणडोह पर्यंत 17 मार्च 2018 रोजी सात डब्याच्या रेल्वेची चाचणी करण्यात आली . नंतर नगर – नारायणडोह – सोलापूरवाडी या 15 किमी अंतरावर 25 फेब्रुवारी 2019 रोजी सात डब्याची रेल्वे चाचणी झाली. त्यानंतर गेल्या 29 डिसेंबरला नगर ते आष्टी दरम्यात यशस्वी चाचणी झाली. 9 डिसेंबर रोजी नगर कडा दरम्यान दोन डब्यांची रेल्वे गाडी आणून चाचणी झाल्यानंतर 29 डिसेंबर 2021 ला नगर ते आष्टी या साठ किलोमीटर अंतरावर ताशी 144 किलोमीटर वेग असलेल्या हायस्पीड रेल्वेची चाचणी झाली त्यावेळी दक्षिण मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोलापूर वाडी ते आष्टी या 31 किलोमीटर रेल्वेमार्गावर पहिल्यांदाच बारा डब्यांची रेल्वे गाडी धावली.