Beed News: वेळेआधी जन्म, हालचालही करेना; मृत घोषित केलेलं बाळ अंत्यसंस्कारावेळी रडायला लागलं अन्...; नातेवाईकही हादरले
Beed News: नवजात बाळाचे वजन खूपच कमी होते आणि त्यात त्या बाळाची कसलीही हालचाल होत नव्हती. त्यामुळे डॉक्टरांनी त्या बाळाला मृत घोषित करून बाळ नातेवाईकांकडे सुपूर्द केले.

अंबाजोगाई (जि. बीड) : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई या ठिकाणी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी (ता.8) अंबाजोगाई येथे एक चमत्कारासारखी घटना घडली. डॉक्टरांनी कमी दिवसांत आणि कमी वजनाने जन्मलेले बाळ मृत घोषित केल्यानंतर त्याचे नातेवाईक अंत्यसंस्काराची तयारी करत असताना, अचानक बाळाने हालचाल केली आणि ते रडू लागले. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून, हॉस्पिटल प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी एका महिलेला वेळेपूर्वी बाळंतपण झाले. नवजात बाळाचे वजन खूपच कमी होते आणि त्यात त्या बाळाची कसलीही हालचाल होत नव्हती. त्यामुळे डॉक्टरांनी त्या बाळाला मृत घोषित करून बाळ नातेवाईकांकडे सुपूर्द केले. नातेवाईकांनी दुःखात अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली होती. मात्र, त्या दरम्यान बाळात हालचाल दिसून आली आणि काही क्षणांतच बाळ रडू लागले. ही घटना पाहून सर्वजण अवाक झाले.
नेमकं काय घडलं?
केज तालुक्यातील होळ येथील महिला प्रसुतीसाठी सोमवारी रात्री येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल झाली होती. रात्री महिलेने मुलाला जन्म दिला. मात्र, हे मूल हालचाल करत नव्हते. बाळास डॉक्टरांनी मृत घोषित केले व ते बाळ नातेवाइकांकडे दिले. बाळावर अंत्यसंस्कार करण्याची सर्व तयारी सुरू असतानाच अचानकच त्या बाळाची हालचाल सुरू झाली आणि ते बाळ रडू लागलं. नातेवाइकांनी तत्काळ त्या बाळाला डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी त्या बाळावर उपचार सुरू केले आहेत.
कुशीत घेताच सुरू झाली हालचाल
बाळाला डॉक्टरांनी मृत घोषित करून नातेवाइकांकडे सोपवलं. त्याला अंत्यसंस्कारासाठी होळ येथे नेले असता, एका वृद्ध महिलेने बाळाला उघडून पाहिले असता हालचाल दिसली. त्यामुळे महिलेने त्याला कुशीत घेताच बाळ रडले आणि जिवंत असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
या घटनेवरती अंबाजोगाई,स्त्रीरोग व प्रसुती विभागप्रमुख, डॉ. गणेश तोडगे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, प्रसुतीचा काळ पूर्ण होण्यापूर्वीच हे बाळ जन्माला आले होते. त्याचे वजन केवळ 900 ग्रॅम आहे. जन्मानंतर त्याची कसलीही हालचाल झालेली नव्हती. त्यामुळे असा प्रकार घडला असावा, असं त्यांनी म्हटलं आहे. अंबाजोगाई तर विभागप्रमुखांकडून घटनेचा अहवाल तत्काळ मागवला आहे. चौकशीसाठी समिती नेमली आहे. दोषींवर कारवाई केली जाईल असं. प्रभारी अधिष्ठाता, स्वा. रा. ती. रुग्णालय, डॉ. राजेश कचरे यांनी म्हटलं आहे.























