धक्कादायक! बीड जिल्ह्यात मागील पाच वर्षात 4 हजार 714 महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या
Beed News : यातील 55 टक्के महिलांच्या गर्भाशय हे खाजगी रुग्णालयामध्ये करण्यात आले आहे.
बीड : काही वर्षांपूर्वी बीड (Beed) जिल्ह्यात अवैध गर्भपिशव्या काढण्याचे प्रमाण वाढले होते. त्यानंतर शासनाकडून यावरती कडक पाऊलं उचलण्यात आली होती. विशेष म्हणजे सध्या बीड जिल्ह्यात खाजगी अथवा शासकीय रुग्णालयामध्ये कोणत्याही कारणाने एखाद्या महिलेची गर्भ पिशवी काढायची असल्यास त्यासाठी जिल्हा रुग्णालयाची परवानगी लागते. अशीच परवानगी दिलेले मागच्या पाच वर्षात एकूण 4 हजार 714 महिलांच्या गर्भाशयाच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. यातील 55 टक्के महिलांच्या गर्भाशय हे खाजगी रुग्णालयामध्ये करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या वर्षांची आकडेवारी पाहता गर्भाशय पिशवी काढण्याचे प्रमाण घटले आहेत.
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 2022 मध्ये बीड जिल्ह्यात एकूण गर्भाशय पिशवी काढण्यासाठी शासनाची परवानगी घेतलेल्या महिलांची संख्या ही 1 हजार 377 इतकी होती. मात्र, 2023 मध्ये गर्भपिशवी काढण्याचे महिलांचे प्रमाण कमी झाले असून, 2023 मध्ये 916 महिलांनी गर्भपिशवी काढण्यासाठी परवानगी घेतली आहे. याचा अर्थ मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी बीड जिल्ह्यात कायदेशीर गर्भपिशवी काढण्याचे प्रमाण कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, मागील पाच वर्षांची संख्या पाहिल्यास ती एकूण 4 हजार 714 एवढी आहे.
गर्भपिशवी काढण्याचे प्रमाण घटले
यापूर्वी बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गर्भपिशवी काढण्याचे प्रकरण समोर आले होते. मात्र, त्यानंतर जिल्ह्यात खाजगी अथवा शासकीय कोणत्याही रुग्णालयामध्ये जर गर्भपिशवी काढायचे असेल त्यासाठी आरोग्य विभागाची परवानगी सक्तीची केल्याने बेकायदेशीर गर्भाशय शस्त्रक्रियेला मोठ्या प्रमाणात आळा बसल्याचे पाहायला मिळत आहे. तर, 2022 पेक्षा 2023 मध्ये गर्भपिशवी काढण्याचे प्रमाण घटले आहेत.
महिला नाइलाजास्तव गर्भाशय काढतात
ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीडमध्ये मागील पाच वर्षात एकूण 4 हजार 714 महिलांच्या गर्भाशय पिशव्या काढण्याच्या शस्त्रक्रिया झाल्या. यामध्ये बहुतांश महिला ऊसतोड कामगार होत्या. महिलांचे गर्भाशय काढतांना अनेक वैध कारणं दिले जातात. मात्र, प्रत्यक्षात अनेक महिला नाइलाजास्तव गर्भाशय काढतात. ऊस तोडीसाठी गेल्यावर दुखण्याने बेजार महिला दुखणे अंगावर काढण्यापेक्षा गर्भाशय काढण्यास प्राधान्य देतात. तसेच, महिला आजारी असल्यास कामाचे होणाऱ्या नुकसानीमुळे मुकादम अशा महिलांना कामावर नेत नाही. त्यामुळे, पोटापाणीसाठी ऊसतोड महिला नाइलाजास्तव गर्भाशय काढत असल्याचे देखील अनेकदा समोर आले आहे. मात्र, असे असलं तरीही मागील काही वर्षात हे प्रमाण घटले असल्याचे देखील आकडेवारीमधून समोर येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Beed : घराला अचानक लागलेल्या आगीत अंध वृद्धाचा मृत्यू, घराबाहेर पडता न आल्याने दुर्दैवी घटना