Beed News : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गावात गेला पण मराठा आंदोलक आडवे आले; शरद पवार गटाच्या नेत्याची वेशीवरच नाकाबंदी
Maratha Reservation : जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही आणि सगेसोयऱ्यांना आरक्षण दिले जात नाही तोपर्यंत आम्ही गावात फिरकू देणार नाही असा इशारा बीडमधील तालखेड गावातील तरुणांनी राजकीय नेत्यांना दिला आहे.
बीड : मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश न करता, सगेसोयऱ्यांच्या मुद्द्याची अंमलबजावणी न करता दिलेल्या स्वतंत्र्य आरक्षणावरून (Maratha Reservation) मराठा आंदोलकांमध्ये धुसफूस असल्याचं दिसतंय. मराठवाड्यात याची तीव्रता जास्त असून त्याचा फटका आता राजकीय नेत्यांना बसत असल्याचं चित्र आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी गेलेल्या शरद पवार गटाचे नेते, माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड (Jaisingrao Gaikwad Patil) यांना बीडमधील तालखेड गावातील मराठा तरुणांनी गावात प्रवेश करू दिला नाही. जोपर्यंत सगेसोयऱ्याच्या मुद्द्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत गावात येऊ नका असा इशाराही त्यांनी दिला.
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील तालखेड येथे लोकसभेच्या अनुषंगाने फिरत असलेले माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयसिंगराव गायकवाड हे गुरूवारी दुपारी आले होते. ते येताच गावातील काही युवकांनी त्यांना खाली उतरण्यास मज्जाव केला. यानंतर गायकवाड यांना गाडीतून खाली न उतरताच परतण्याची वेळ आली.
दारात येऊ नका म्हटलं तरी कशाला येता
बीड जिल्ह्याचे दोन वेळा खासदार राहिलेले आणि एक वेळा केंद्रात मंत्री राहिलेले जयसिंगराव गायकवाड हे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्याचा दौरा करत आहेत.त्यांना मराठा समाजातील तरुणांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. ते माजलगाव तालुक्यातील तालखेड या ठिकाणी भेटीगाठीच्या निमित्ताने आले होते. त्यांनी गावात प्रवेश करताच आमच्या गावात, दारात येऊ नका म्हटलं तरी कशाला येता रे नेते अशा शब्दात तरुणांनी खडसावलं. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही आणि सगेसोयऱ्यांना आरक्षण दिले जात नाही तोपर्यंत आम्ही गावात फिरकू देणार नाही असे म्हणत त्यांना खाली उतरूच दिले नाही.
मराठा तरुणांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे जयसिंगराव गायकवाड यांना मात्र वेशीवरूनच मागे फिरावं लागलं. त्यामुळे येत्या काळात अशाच प्रकारचा फटका इतरही नेत्यांना बसण्याची चिन्हं आहेत.
मनोज जरांगे यांच्यावर पाचवा गुन्हा
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांच्यासह इतर 12 जणांवर बीडमध्ये विना परवाना रॅली काढून जेसीबीने फुल उधळल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज जरांगे यांच्यावर हा पाचवा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने त्यांच्यासमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
ही बातमी वाचा: