Beed Lok Sabha : राजकीय स्वार्थासाठी पंकजा मुंडेंनी विनायक मेटेंचा फोटो आणि पक्षाचे नाव वापरू नये; शिवसंग्रामने स्पष्ट केली भूमिका
Beed Lok Sabha Constituency : भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून शिवसंग्रामच्या नावाचा दुरुपयोग करण्यात येत असल्याचा आरोप शिवसंग्राम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
Beed Lok Sabha Constituency : आगामी लोकसभा (Lok Sabha Election 2024) निवडणुकीच्यादृष्टीने प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या बीड मतदारसंघातील (Beed Lok Sabha) भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि दिवंगत नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या शिवसंग्राम पक्षात वाद उफाळून येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसंग्राम पक्ष महायुतीचा घटक पक्ष असल्याचा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे सध्यातरी शिवसंग्राम पक्ष आपल्या तटस्थ भूमिकेवर ठाम असल्याचे बोलले जात आहे. असे असताना महायुतीच्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून शिवसंग्रामच्या नावाचा आणि दिवंगत नेते विनायकराव मेटे यांच्या फोटोचा दुरुपयोग करण्यात येत असल्याचा आरोप शिवसंग्राम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
महाराष्ट्रभरात भाजपकडून शिवसंग्रामचे नाव आणि फोटो कोठेही वापरण्यात येत नाही. मात्र केवळ एका मतदारसंघात मतांचे राजकारण करण्यासाठी पंकजा मुंडे यांच्याकडून खोडसाळपणे शिवसंग्रामच्या नावाचा आणि दिवंगत नेते विनायकराव मेटे यांच्या फोटोचा दुरुपयोग करण्यात येत असल्याचा आरोपही शिवसंग्राम पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे.
राजकीय स्वार्थासाठी शिवसंग्रामचा वापर
गेल्या 2019 च्या निवडणुकीत शिवसंग्राम पक्ष महायुतीत असताना देखील विनायक मेटे यांचा फोटो आणि नाव महायुतीच्या उमेदवारांनी वापरले नव्हते. त्यामुळे आता या लोकसभेच्या निवडणुकीत देखील पंकजा मुंडे यांनी राजकीय स्वार्थासाठी शिवसंग्राम पक्षाचे नाव आणि विनायक मेटे यांचा फोटो वापरू नये, अशी भूमिका घेतली आहे. त्याकरीता तशा आशयाचे पत्रकही शिवसंग्राम पक्षाच्या वतीने काढण्यात आले आहे. शिवसंग्राम पक्षाचे मत आपल्याला मिळावेत म्हणून पंकजा मुंडे मुद्दाम शिवसंग्राम पक्षाचे नाव वापरत आहेत, अशी टीका देखील शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
स्वर्गीय विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे या लोकसभेच्या निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत आहेत. मात्र, कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवायची की अपक्ष निवडणूक लढवायची, हे त्यांनी अद्यापही स्पष्ट केलेलं नाही. त्यातच महायुतीचे उमेदवार पंकजा मुंडे यांनी आपला प्रचार सुरू केला असून त्यांच्या प्रचारासाठी ज्या बैठका घेतल्या जात आहेत, त्या बैठकासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर शिवसंग्राम पक्षाचे नाव असल्याने आमच्या पक्षाचे नाव त्यांनी वापरू नये, अशी भूमिका शिवसंग्रामने घेतली असल्याचे मत शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी बोलताना व्यक्त केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या